Kolhapur : जिल्हा परिषदेची कमवा व शिका योजना : मुख्य कार्यकारी संजयसिंह चव्हाण | पुढारी

Kolhapur : जिल्हा परिषदेची कमवा व शिका योजना : मुख्य कार्यकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील बी.बी.ए. (B.B.A Service management)) च्या गुणवंत आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कमवा आणि शिका योजना राबविण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मंगळवारी दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले होते. राजर्षी शाहू महाराजांचे 2022-23 हे वर्ष स्मृती शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने जिल्हा परिषद कमवा आणि शिका योजना वरील विद्यार्थ्यांसाठी राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये 3 वर्षांसाठी प्रशासकीय कामाची व पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञानकौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी 8 हजार रुपये, दुसर्‍या वर्षी 9 हजार व तिसर्‍या वर्षी 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे दरमहा निवास आणि भोजन खर्चासाठी मदत म्हणून 4 हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Back to top button