कविट गावातील शेतकर्‍यांनी घेतले काळ्या मक्यातून विक्रमी उत्पन्न | पुढारी

कविट गावातील शेतकर्‍यांनी घेतले काळ्या मक्यातून विक्रमी उत्पन्न

करमाळा (सोलापूर), अशपाक सय्यद : कंपन्याही सतत संशोधन करुन अधिकाधिक उत्पन्न घेणारे संकरित बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करतात. मात्र या बियाण्यांच्या माध्यमातून उत्पन्न वाढत असले तरी जनावरांच्या व मानवाच्या आरोग्यावर याचा काय दुष्परिणाम होतो, याकडे गांभीर्याने पाहिलेे जात नाही. नेमका हाच धागा धरत बोटावर मोजण्याइतके काही संवेदनशील, दूरदृष्टीचे व अभ्यासू तरुण शेतकर्‍यांनी पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी चळवळ उभारण्यास आरंभ केला आहे. करमाळा तालुक्यातील कविट गावचे राम चौधरी तसेच वांगी गावचे हनुमंत यादव यांनी अनेक उपक्रम सेंद्रिय शेतीमधून राबवले आहेत.

कविट गावचे राम चौधरी यांनी पारंपरिक व लयास गेलेला काळा मका, काळा गहू यांच्या गावरान बियाण्यांचे संवर्धन केले आहे. त्यापासून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ते धडपडत आहेत.

याबाबत ते म्हणाले, काळ्या मक्याची लागवड मी तीन वर्षांपासून करत आहे. काळा मका हा गावरान व सकस आहारात मोडत आहे. हा काळा मका सध्याच्या मक्यापेक्षा जास्त उत्पादन देतो. याला साधारण दोन मोठी कणसे येतात. साध्या मक्याची साधारणपणे आपण जून महिन्यात पेरणी करतो. साध्या मक्याला उन्हाळ्यात कणसे भरत नाहीत. मात्र काळ्या मक्याचे पीक बाराही महिने कोणत्याही हंगामात घेऊ शकतो. त्याला दोन मोठी कणसे लागतात व या कणसात पूर्णपणे दाणे भरतात. उन्हाळ्यातसुद्धा चांगल्या प्रतीची कणसे येतात.

उन्हाळ्यात काळ्या मक्याच्या तुलनेत साधा मका तग धरत नाही. उष्ण हवा सतत वाहात असल्यामुळे साध्या मक्याची कणसे भरत नाहीत. परिणामी उन्हाळ्यात साध्या मक्याचे पीक घेता येत नाही. त्यामुळे याकाळात सर्वात चांगला पर्याय शेतकर्‍यांपुढे आहे तो म्हणजे काळ्या मक्याचा. याची लागवड 12 महिन्यांत कधीही करता येते तसेच उत्पन्नही चांगले मिळते. विशेष म्हणजे या मक्याचा जनावरांच्या खुराकात वापर केल्यास, त्यांना भरडा करुन दिल्यास दुधाळ जनावरांचे नेहमीपेक्षापेक्षा किमान दोन ते तीन लिटरने दूध नक्की वाढते, हा अनुभव आहे. काळ्या मक्याचा आहारात समावेश केल्याने दुभत्या जनावरांचेही आरोग्य उत्तम राहते. मका माणसांनादेखील खाण्यास खूप उपयुक्त आहे. याचा आहारात समावेश केल्याने कॅल्शिअम वाढते तसेच शुगर, ब्लडप्रेशर यासारख्या आजारांवर काळ्या मक्याची भाकरी अत्यंत गुणकारी ठरली आहे. काळ्या मक्यात फायबर, मॅग्नेशियम, आयर्न, लोह, प्रोटिन, कॅल्शिअमचे प्रमाण साध्या मक्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे.

साध्या मक्याचे उत्पादन हेक्टरी 50 क्विंटलपर्यंत निघते, हा अनुभव आहे. संकरित वाणाच्या तुलनेत काळ्या मक्याचे उत्पादन 55/60 क्विंटल निघते. हा मका कोणत्याही हवामानात येत असल्याने हे वाण आपल्या सध्याच्या काळात संजीवनी ठरत आहे. मार्केटमध्ये या काळ्या मक्याची विक्री करता येते. मात्र याचे महत्त्व कमी असल्याने त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या मक्याची विक्री 27 रुपये प्रति किलो दराने सध्या सुरू आहे.

सध्याच्या काळात संकरित वाणाच्या बियाण्यांची सर्वत्र रेलचेल असताना काही शेतकरी जुन्या व पारंपरिक पद्धतीच्या बियाण्यांचे संवर्धन करण्याचा वसा घेऊन वावरताना आढळून येतात. मात्र कविट गावातील दोन शेतकर्‍यांनी अनोखे प्रयोग करत सेंद्रिय शेतीमधून आरोग्यदायी असे वेगळ्या प्रकारचे काळ्या मक्याचे उत्पन्न घेऊन सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

वैशिष्ट्ये

  • काळा मका 12 महिने घेता येते.
  • काळा मका गावरान व सकस आहारात मोडतो.
  • इतर मक्यापेक्षा काळ्या मक्याचे जास्त उत्पन्न.
  • जनावरांना दिल्यास दोन ते तीन लिटर जास्त दूध वाढते.
  • माणसांसाठीही उपायकारक. देठाला दोन कणसे लागतात.

काळा मका आम्ही 2017 पासून लावत आहे. याचे बियाणे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. परंतु हे बियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.या बियाण्याचे संवर्धन व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे.
– राम चौधरी
मु पो. कविट गाव, ता. करमाळा, जि. सोलापूर.

 

Back to top button