नांदूरमध्यमेश्वर : ’पक्षितीर्था’च्या गंगाजळीला ओहोटी ; पर्यटकांची संख्या रोडावली | पुढारी

नांदूरमध्यमेश्वर : ’पक्षितीर्था’च्या गंगाजळीला ओहोटी ; पर्यटकांची संख्या रोडावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या आणि नुकताच रामसरच्या यादीत समावेश झालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पक्षी हंगामाला सलग दुसर्‍या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या धास्तीने ’पक्षितीर्था’ला येणार्‍या पर्यटकांची संख्या रोडावल्याने उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी सुमारे सव्वासात लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा अवघ्या साडेतीन लाखांच्या उत्पन्नावर वन्यजीव विभागाला समाधान मानावे लागले आहे.

दरवर्षी सप्टेंबर ते मार्च या कालावधीत नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभारण्यात विदेशी पाहुण्यांची मोठी मांदियाळी बघावयास मिळते. स्थानिक स्थलांरित पक्ष्यांची संख्याही लक्षणीय असते. फ्लेमिंगोसह हळदीकुंकू बदक, जांभळी पाणकोंबडी, पिनटेल, टफ्टेड, पोचार्ड, राखी बगळा, जांभळा बगळा, तुतवार, थापट्या, गढवाल, ग्रेट स्पॉटेल ईगल, मार्श हॅरियर, पाणकावळे, रंगीत करकोचा, ग्लॉसी आयबिस, उघड्या चोचीचा करकोचा, चमचा, किंगफिशर, हुदहुद, बी ईटर आदी पक्ष्यांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी बघावयास मिळते.

कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी हंगाम सुरू झाल्यानंतरही पर्यटकांनी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरविली होती. कोरोना निर्बंधमुक्तीनंतर नांदूरमध्यमेश्वर हे पक्षी अभयारण्यदेखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, कारोनामुळे पर्यटक येण्यास धजावत नाहीत. पर्यटकांच्या गर्दीवर परिणाम झाल्याने महसुलाला याचा फटका बसला आहे. स्थानिक पातळीवरील अर्थचक्राला अपेक्षित गती मिळू शकली नाही. त्यामुळे स्थानिकांच्या उदरनिर्वासह अभयारण्यातील कामाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, पर्यटन संचालनालय व वन्यजीव विभाग (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने 5 आणि 6 मार्चला नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दोन दिवसीय पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती. मात्र, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसारच महोत्सवाचे शुल्कमाफ करण्यात आल्याने वन्यजीव विभागाला हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

यंदा कोरोनाच्या धास्तीचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाला आहे. नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याला रामसरचा दर्जा प्राप्त झाल्याने पुढील हंगामात पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. त्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.- शेखर देवकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य

महिनानिहाय पर्यटकांची संख्या व उत्पन्न…..

महिना            पर्यटकांची संख्या                         उत्पन्न
ऑक्टोबर          558                                          27,040
नोव्हेंबर            2,150                                        1,10,375
डिसेंबर             2,142                                        1,05,790
जानेवारी           1,065                                        54,715
फेब—ुवारी         352                                            26,630
मार्च                300                                             26,750

हेही वाचा :

Back to top button