नाशिक : मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा गोदापात्रात बुडून मृत्यू ; २४ तासांत दुसरी घटना | पुढारी

नाशिक : मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा गोदापात्रात बुडून मृत्यू ; २४ तासांत दुसरी घटना

पंचवटी, पुढारी वृत्तसेवा : रामकुंडातील गांधी तलावात बुडून १६ वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेला २४ तास झाले. तोपर्यंत पुन्हा आणखी एकाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि.18) रात्री तरूण बुडाला. या तरुणाचा रामकुंडावरील जीवरक्षकांनी शोध घेत मंगळवारी (दि. 19) दुपारी पाण्याबाहेर काढले. मृत तरुण मनपाचा कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

रामकुंडावरील गांधी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एक जण बुडाल्याची घटना रविवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास घडली होती. यात १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. तर, जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे अन्य दोघाचा जीव वाचला होता. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच खंडेराव मंदिर परिसरातील गोदापात्रात सोमवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास एक तरुण बुडाला. यावेळी नदीपात्रात बराच शोध घेऊनही हा तरुण काही सापडला नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 19) सकाळपासून अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षक दलाच्या तरुणांकडून शोधकार्य सुरू होते. अथक प्रयत्नानंतर अखेर सायंकाळी साडे चार ते पाचच्या सुमारास टाळकुटेश्वर मंदिर परिसरातील गोदापात्रात या तरुणाचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षकांना यश आले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

राकेश विनायक नेहरे (२५, रा. क्रांतीनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मनपाचा कंत्राटी कर्मचारी होता. मनपाच्या पंचवटी मलेरिया विभागात तो औषध फवारणीचे काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, त्यांच्या जागेवरच राकेश कामाला लागला होता. दरम्यान, यावेळी रामकुंडावरील आदिवासी जीवरक्षक दलाचे विश्वनाथ कवटे, सुरेश वाघमारे, दीपक जगताप, सुनील बोरसे, दीपक माळी, दत्ता कवटे, कान्हा खांदवे, शंकर माळी, उदय संघमफे, उदय वाघमारे, रोहित वाघमारे, यशवंत जाधव, प्रदीप सहाणे, अजय पाटील, बाप्पा सोळंके, लखन पवार आदी तरुण बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात पोहत होते.

हेही वाचा  

Back to top button