पैठण : घारेगाव येथे वाळू माफियावर कारवाई ; ३५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

पैठण : घारेगाव येथे वाळू माफियावर कारवाई ; ३५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील गोदावरी नदीत पंधरा दिवसापूर्वी मध्यरात्री ग्रामीण पोलीसांनी वाळू माफियावर कारवाई केली होती. यानंतर मंगळवारी (दि.19) पहाटे पैठण उपविभागीय पोलिसांनी घारेगाव सुकना नदी पात्रात वाळू माफियावर कारवाई केली. यावेळी अवैध वाळु उपसा करणारा एक जेसीबी व एक हायवा असा एकूण 35 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पेट्रोलिंग करण्याचा आदेशानुसार, पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सुकना नदीपात्रात छापा मारला. यावेळी जेसीबी मशिनने वाळू उत्खनन सुरू होते. तसेच तेथे एक हायवा ट्रक (क्र. MH EG- 9010) हे अंधाराचा फायदा घेऊन फ़रार करण्यात प्रयत्‍न केला.

हायवा ट्रक आणि जेसीबी (क्र. MH21-D 4180) पोलिसांनी जप्त केला. चालक-मालक नासिम गुलाब शेख (रा. खादगाव ता. पैठण) याला अटक करून एकूण 35 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा  

Back to top button