सत्ताधाऱ्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून भाजपच्या रथाची तोडफोड : प्रवीण दरेकर | पुढारी

सत्ताधाऱ्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून भाजपच्या रथाची तोडफोड : प्रवीण दरेकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल अभियान प्रचार रथ मुंबईत फिरविण्यात येत आहे. दरम्यान, चेंबूरमध्ये या रथाची काही अज्ञातांनी तोडफोड केली आहे. सत्ताधाऱ्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ही तोडफोड केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

आज (मंगळवारी) मुंबईत चेंबूर कॅम्प येथे पोलखोल अभियानाचे उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार होते. त्याआधीच रथाची तोडफोड केली आई. शिवसेनेकडून हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचा दावा कार्यक्रमाचे आयोजक राजेश शिरवाडकर यांनी केला आहे.
याबाबत प्रविण दरेकर म्हणाले की, शिवसेनेचा पालिकेतील कारभार सर्वांना माहीत आहे. आम्ही या कारभाराची पोलखोल करणार आहोत. त्यामुळे असे हल्ले होत आहेत. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर सरकार जबाबदार राहील. आम्ही लोकशाही पद्धतीने हा विरोध करत आहोत. आंदोलन करत आहोत. तो आमचा अधिकार आहे, असे दरेकर म्हणाले.

या पोलखोल अभियानाच्या रथावर सत्ताधारी लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून दगडफेक केली आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला. तोडफोड करणाऱ्यांना अटक केली नाही, तर आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करू, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button