नाशिक : वादग्रस्त दोन उड्डाणपुलांविरोधात आणखी एक याचिका | पुढारी

नाशिक : वादग्रस्त दोन उड्डाणपुलांविरोधात आणखी एक याचिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर आणि सिटी सेंटर ते मायको सर्कल या दोन वादग्रस्त ठरलेल्या उड्डाणपुलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल झाली आहे. पुलाचे काम सुरू व्हावे, यासाठी मनपा प्रशासनाने सुधारित आदेश काढले असतानाच पुन्हा याचिका दाखल झाल्याने उड्डाणपुलाच्या अडचणीत भर पडणार आहे. मनसेतर्फे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सदरची याचिका दाखल केली आहे.

मनपाने आर्थिक तरतूद आणि कार्यारंभ आदेश दिलेले संबंधित दोन्ही उड्डाणपूल अगदी पहिल्यापासूनच वादात सापडले आहेत. आधी भाजप आणि शिवसेनेतील राजकीय कलगीतुरा आणि त्यानंतर पुलांच्या निविदा प्रक्रियेतील गैरप्रकार तसेच सिमेंटची प्रतवारी अशा विविध कारणांमुळे उड्डाणपुलाच्या प्रक्रियेबाबतच अनेक संशय निर्माण झाले आहेत. याच अनुषंगाने स्थायी समितीच्या सभेत भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संपूर्ण प्रक्रियेची चौकशीची मागणी केली आहे. शहाणे यांच्या या याचिकेचे रूपांतरण आता जनहित याचिकेत झाले असून, यापाठोपाठ आता माजी नगरसेवक तथा मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनीही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने उड्डाणपुलासमोरील तसेच मनपा प्रशासनासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दातीर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, प्रशासनाने 11 मे 2021 रोजी दिलेल्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती द्यावी तसेच या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी याचिकाकर्ते दातीर यांनी केली आहे. उड्डाणपुलाची खरोखरच गरज आहे का, संबंधित भागातील नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान याबाबी तपासण्याची विनंती दातीर यांनी करत चौकशी होत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करू न देण्याची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी जनहित याचिका (पीआयएल (एसटी)/ 7860/2022(सी) दिलीप दत्तु दातीर विरुद्ध नाशिक मनपा द्वारा आयुक्त व इतर दाखल करून घेतली आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : श्री संत बाळूमामांनी स्वतः बसवलेला भूत काढायचा खांब,मूळ क्षेत्र मेतके भाग-२ I मेतके येथील खरा खांब

 

Back to top button