बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या सहा महिन्यांत केंद्रीय गृह मंत्रालयाने दोनवेळा बैठका घेऊन आसाम आणि मेघालयाचा सीमाप्रश्न सोडवला. या राज्यांना केंद्र सरकारने न्याय मिळवून दिला असून 65 वर्षांपासून धगधगत असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद कधी सोडवणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने मंगळवारी (दि. 29) आसाम आणि मेघालयमधील 50 वर्षे जुना सीमावाद सोडवण्यात आला. याआधी याच राज्यांतील भागांत उद्भवलेला सीमावाद सोडवला होता. आता या दोन्ही राज्यांतील सीमावाद संपूर्णपणे संपुष्टात आणला आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन असे वाद सोडवणे कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंत्री अमित शहा यांचे कौतुकही करण्यात येत आहे.
आसाम आणि मेघालयमधील सीमावाद संपुष्टात आल्याची माहिती सोशल मीडियावर झळकताच संपूर्ण सीमाभाग आणि महाराष्ट्रातूनही महाराष्ट्र?कर्नाटकाचा सीमावाद सोडवण्यात यावा, अशी मागणी जोर लावून धरली जात आहे. 65 वर्षांपासून बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठीबहुल सीमावर्ती गावांनी महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची मागणी लावून धरली आहे. आंदोलने केली, हुतात्मे दिले, अजूनही लढा सुरूच आहे. वाद न्यायालयात पोचला असला तरी त्यावर न्यायालयाबाहेरही तोडगा काढला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने सीमाप्रश्नी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी अमित शहा बेळगावात आले होते. त्यावेळी म. ए. समिती नेत्यांना त्यांना भेटण्यास परवानगी मिळाली नाही. वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहे. पण, आता या प्रश्नी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्यावे, मराठी जनतेला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सीमावाद कधीच संपला आहे, असा आव आणत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकाकडून राजकीय शेरेबाजी होत आहे. पण, प्रत्यक्षात सीमावासीयांना न्याय मिळत नसल्यामुळे या प्रश्नावर मंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
आसाम आणि मेघालयमधील 50 वर्षांपासूनचा सीमावाद मिटला, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे अभिनंदन करतो. अमित शहा यांनी आता महाराष्ट्र व कर्नाटकमधील सीमा वादातही हस्तक्षेप करावा आणि सीमाभागात राहणार्या मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी कळकळीची विनंती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अमित शहा यांच्याकडे सोशल मीडियावरुन केली आहे.
हेही वाचलत का ?