नाशिक : गुढीपाडव्यासाठी परवानग्या अडवलेल्या नाहीत : ना. भुजबळ | पुढारी

नाशिक : गुढीपाडव्यासाठी परवानग्या अडवलेल्या नाहीत : ना. भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांच्या परवानगीवरून पोलिस आयुक्त व नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या पदाधिकार्‍यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म हाउस येथे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमांच्या परवानगीबाबत माहिती जाणून घेतली. त्यानुसार गुढीपाडव्यानिमित्त आयोजित बहुतांश कार्यक्रमांना परवानगी दिल्याचे सांगत परवानगीसाठी पोलिसांनी अडवणूक केली नसल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वीर मिरवणूक व रंगपंचमीच्या दिवशी आयोजकांवर दाखल गुन्ह्यांबाबतही पोलिस सकारात्मक विचार करतील, असा विश्वास ना. भुजबळ यांनी व्यक्त केला.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा कार्यक्रम, आंदोलन करण्यासाठी पोलिस व मनपा परवानगी आवश्यक आहे. परवानगी नसल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होत आहे. त्यानुसार गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा समितीनेही पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला. मात्र, पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे तसेच अधिकारी समितीच्या पदाधिकार्‍यांना सहा तास कार्यालयाबाहेर ताटकळत ठेवत असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला होता. तर पोलिसांनी कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्यासाठी पदाधिकार्‍यांना भेटण्याची वेळ दिलेली असतानाही त्यांनी भेट घेतली नसल्याने अद्याप परवानगी दिलेली नाही, असे सांगितले.

त्यावरून पालकमंत्री भुजबळ यांनी पाण्डे्य यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यात पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी परवानगीसाठी कोणाचीही अडवणूक नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या पदाधिकार्‍यांनी भेट न घेतल्याने त्यांना परवानगी दिली नसल्याचे पाण्डे्य यांनी सांगितले. नागरिकांना कोणत्याही कार्यक्रमाची यापुढे ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्यात येईल, असेही पाण्डेय म्हणाले.

नासर्डी ते पाथर्डी शोभायात्रा…
सिडको : सकल हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने मराठी नववर्षानिमित्त खास गुढीपाडव्याला नासर्डी ते पाथर्डी असे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता शारदा शाळेच्या मैदानावरून निघणार असून, सुखदेव शाळेच्या मैदानावर यात्रेचा समारोप होईल. गृहिणी, महिला उद्योजिका आणि बचत गटासाठी सुखदेव शाळेच्या मैदानावर विविध स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शोभायात्रेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन संगीता जाधव, वंदना बिरारी, पूजा देशमुख, वर्षा कोथमिरे, मनीषा साळुंखे, शालिनी गायकर, प्रतीक्षा दंडगव्हाळ, वर्षा लासुरे, वैशाली दळवी, डॉ. पल्लवी जाधव, ललिता काळे, शोभा दोंदे यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button