IPL 2024 PBKS vs CSK : चेन्‍नईचा पंजाबवर २८ धावांनी विजय, गुणतालिकेत तिसर्‍या स्‍थानी झेप

IPL 2024 PBKS vs CSK : चेन्‍नईचा पंजाबवर २८ धावांनी विजय, गुणतालिकेत तिसर्‍या स्‍थानी झेप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) स्‍पर्धेत आज 53 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने हाेते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला. टाॅस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमावत 139 धावांपर्यंतच मजल मारु शकला. रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 43 धावा करण्यासोबतच तीन विकेट्सही घेत चेन्‍नईचा विजय सुकर केला.

चेन्‍नईची गुणतालिकेत तिसर्‍या स्‍थानी झेप

या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्याकडे 11 सामन्यांत सहा विजय आणि पाच पराभवांसह 12 गुण आहेत. या विजयामुळे सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. त्याचवेळी पंजाब संघाचा हा सातवा पराभव ठरला. हा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. चेन्नईचा पुढील सामना गुजरात टायटन्सशी अहमदाबादमध्ये १० मे रोजी होणार आहे. त्याचवेळी पंजाबचा संघ 9 मे रोजी धरमशाला येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी भिडणार आहे.

पंजाबची १३९ धावांपर्यंतच मजल

१६७ धावांच्‍या लक्ष्‍याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली.नऊच्या धावसंख्येवर पंजाबला दुसऱ्याच षटकात दोन धक्के बसले. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तुषार देशपांडेने जॉनी बेअरस्टोला बोल्ड केले. त्याला सहा चेंडूंत सात धावा करता आल्या. यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रिले रुसो क्लीन बोल्ड झाला. रुसो खाते उघडू शकला नाही. पाच षटकांनंतर पंजाबने दोन गडी गमावून ३१ धावा केल्या. आठव्या षटकात मिचेल सँटनरने पंजाबला तिसरा धक्का दिला. त्याने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शशांक सिंगला सिमरजीतकडे झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावांची खेळी केली.

पंजाबला चौथा धक्का नवव्या षटकात ६८ धावांवर बसला. रवींद्र जडेजाने प्रभसिमरन सिंगला समीर रिझवीकरवी झेलबाद केले. त्याला 23 चेंडूत 30 धावा करता आल्या. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. पंजाबला 69 धावांवर पाचवा धक्का बसला. सिमरजीत सिंगने जितेश शर्माची विकेट घेतली. जितेशला खाते उघडता आले नाही

पंजाबला सलग दाेन धक्‍के, ७९ धावांवर गमावली सातवी विकेट

रवींद्र जडेजाने 13व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. या षटकात त्याने कर्णधार सॅम कुरन आणि आशुतोष शर्मा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. करण सात धावा करून तर आशुतोष तीन धावा करून बाद झाला. 13 षटकांनंतर पंजाबची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 79 धाव केल्‍या

चेन्नईने ९८ धावांमध्‍ये ९ विकेट गमावल्‍या

चेन्नईची धावसंख्या आठव्या षटकात एका विकेटवर 69 धावा होती. यानंतर संघाने 98 धावा करताना उर्वरित नऊ विकेट गमावल्या. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या शिवम दुबेला सलग दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीही डावातील पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 26 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 21 चेंडूत 32 आणि डॅरिल मिशेलने 19 चेंडूत 30 धावा केल्या. रहाणे 9 धावा केल्यानंतर, मोईन अली 17 धावा केल्यानंतर, मिचेल सँटनर 11 धावा केल्यानंतर, शार्दुल ठाकूर 17 धावा करून बाद झाला. पंजाबकडून राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर अर्शदीप सिंगने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी सॅम कुरनला एक विकेट मिळाली.

हर्षलने शार्दुल पाठोपाठ धोनीलाह पाठवले तंबूत

हर्षलने 19व्या षटकात सलग दोन चेंडूंवर शार्दुल ठाकूर आणि महेंद्रसिंग धोनीला क्लीन बोल्ड केले. शार्दुलला १७ धावा करता आल्या. त्याचवेळी धोनीला खातेही उघडता आले नाही. सध्या रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे क्रीजवर आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघ : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे. इम्पॅक्ट प्‍लेअर : समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी.

पंजाब किंग्ज: जॉनी बेअरस्टो, रिले रौसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, इम्पॅक्ट प्‍लेअर: प्रभसिमरन सिंग, हरप्रीत सिंग भाटिया, तनय थियागराजन, विद्वत कवेरप्पा, ऋषी धवन.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news