कराड : मलकापूरची हवा शुद्ध व आरोग्यदायी | पुढारी

कराड : मलकापूरची हवा शुद्ध व आरोग्यदायी

कराड : पुढारी वृत्तसेवा
माझी वसुंधरा अभियान 2 अंतर्गत मलकापूर नगरपरिषदेने शहरातील सर्व वृक्षांची बेसिल एन्व्हायर्नमेंटल सर्व्हिसेस, मुंबई यांच्यामार्फत जिओ टॅगिंगसह वृक्षगणना पूर्ण केली आहे. या वृक्षगणनेमध्ये मलकापूर शहरातील 9 प्रभागांतील नागरिकांनी स्वत: लावलेली ब नगरपरिषदेमार्फत लावण्यात आलेली अशा एकूण 40 हजार 524 वृक्षांची नोंद झाली आहे.

नोंद झालेल्या वृक्षांमध्ये 171 प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती तसेच हेरिटेजट्री (50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले वृक्ष)- 45, मूळ देशी प्रजाती-23 हजार 438 व इतर वृक्ष- 7086 वृक्षांचे प्रकार आढळून आलेले आहेत. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 45 वृक्षांचे जिओ टॅगिंगसह फोटोची माहिती संकलित करण्यात आली असून नगरपरिषदेच्या संकेतस्थळावरती ती उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सन 2020-21 या सालामध्ये माझी वसुंधरा 1 हे अभियान हाती घेतले होते. या अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मलकापूर नगरपरिषदेस राज्यामध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन देऊन गौरविण्यात आले. आता पुन्हा माझी वसुंधरा 2 अभियान हाती घेतले असून यामध्ये मलकापूरने सहभाग नोंदविला आहे. प्रतिवर्षी शहरातील हरित अच्छादन वाढावे यासाठी राजमंड्रो, आंध्रप्रदेश तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून औषधी वनस्पती आणून त्याचे संगोपन केलेले आहे. शहरातील सर्व मुख्य रस्त्यांना वृक्षारोपण केले आहे. यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करुन ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणेस मदत केलेली आहे. शहरातील प्रमुख ठिकाणांची प्रदूषण नियंत्रण, मंडळाच्या अधिकृत प्रयोग शाळेमार्फत हवेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार हवेची गुणवत्ता निर्देशांक 100 च्या आत असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे मलकापुरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सरासरी 46 आहे.

औषधी वनस्पती, फळे, फुलझाडे लावणार : शिंदे

मलकापूर माझी वसुंधरा अभियान 2 अंतर्गत हरित अच्छादन होण्याकरिता मार्केट यार्ड-नांदलापूर-मलकापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूस औषधी वनस्पती, फळे व फुलझाडे लावण्यात येणार आहेत. तसेच आगाशिवनगर डोंगर उतारावर, फॉरेस्ट ऑफिस, 24 बाय 7 साठवण टाकी ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी औषधी वनस्पती, फळे व फुलझाडे लावण्याचे नियोजन वन विभाग व मलकापूर नगरपरिषद यांच्या संयुक्‍त विद्यमाने केले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

Back to top button