नाशिक : चमचमीत जेवणाला महागाईचा ठसका, दर वाढल्याने बजेट कोलमडले | पुढारी

नाशिक : चमचमीत जेवणाला महागाईचा ठसका, दर वाढल्याने बजेट कोलमडले

मालेगाव : सादीक शेख

मसाल्याशिवाय कोणत्याही भाजीला स्वाद येत नाही. जेवण चमचमीत व झणझणीत करण्यासाठी मिरची मसाला हा महत्त्वाचा घटक आहे. यंदाच्या वर्षी मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. शिवाय मिरचीबरोबरच मसाल्याच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. नाव उन्हाळा सुरू झाला की, गृहिणींची वर्षभरासाठी लागणारा मसाला तयार करून ठेवण्याची लगबग सुरू होते. त्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लाल मिरची. मात्र, यावर्षी मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. मसाला बनवण्यासाठी लवंगी (तेजा) गुंटूर, बेडगी, काश्मिरी, संकेश्वरी, फापडा, रसगुल्ला, सपाटा, सी ५ आदी मिरच्यांचा वापर करतात. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, वर्धा तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात मिरची उपलब्ध होत आहे. मात्र, मसाल्यासाठी प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील गुंटूर परिसरातून मिरची मागवली जाते. गत वर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या मिरचीच्या दरात वाढ झालेली आहे. मसाला बनवण्यासाठी जिथे एक हजार रुपये लागत होते तिथे आता किमान दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. हळद, धने, शहाजिरे, लवंग, मिरी, दालचिनी, वेलदोडा, बाजा, तेजपत्ता, खसखस, खोबरे व अन्य वस्तूंचा वापर करून मसाला तयार केला जातो.

मसाला असल्याशिवाय भाज्यांना लज्जत येत नाही. दोन ते तीन महिन्यांपासून या पदार्थांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांना मसाले विकत घेणे कठीण झाले आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मिरच्यांची नासाडी झाली. दर वाढून अधिक भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मालाचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे मिरचीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. – गौरव साळुंके, मिरची व्यापारी.

नाव दर                 (एक किलो)
सी-5                            180
गुंटूर                             210
फापडा                         270
लवंगी                           220
रसगुल्ला                       600
बेडगी                           400
सपाटा                           520

Back to top button