मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूकीचा आढावा | पुढारी

मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूकीचा आढावा

धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश धुळे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय मुख्य निवडणूक निरीक्षक (सामान्य) पूर्ण चंद्र किशन यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मुख्य निवडणूक निरीक्षक किशन यांनी निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर आढावाप्रसंगी  ते बोलत होते. व्यासपीठावर निवडणूक पोलिस निरीक्षक किशन सहाय, निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी राहुल जाधव, महेश जमदाडे, सीमा अहिरे, पल्लवी निर्मळ, बबन काकडे, नितीन सदगीर आदी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र किशन म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक निर्भय, निष्पक्ष व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मतदार संघात मतदानाची टक्केवारी अधिक वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीच्या निवडणूकीत ज्या भागात कमी मतदान झाले आहे. अशाठिकाणी स्वीप उपक्रमातंर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयेाजन करावे. मतदानाची माहिती पुस्तिका व मतदार माहिती चिठ्ठी प्रत्येक मतदाराला वेळेत पोहचविण्यात यावी. दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तसेच नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. सी-व्हीजील ॲपवर प्राप्त तक्रारींचा वेळेत निपटारा करावा. ईव्हीएमच्या उपयुक्तेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सुक्ष्म नियोजन करुन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे प्रत्येकाने पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

निवडणूक पोलिस निरीक्षक किशन सहाय म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यम, डिजिटल माध्यमांवरून प्रसारित होत असल्यास त्यावर तातडीने प्रतिबंध करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Dhule pudhari.news

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया निर्भय व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी आपले काम सुरू केले असून मतदान व मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करुन त्यांचे पहिले प्रशिक्षणही पूर्ण झाले आहेत. दिव्यांग, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना होम व्होटींगची तर मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटवर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मागील निवडणूकीतील वोटर टर्नआऊची, क्रीटीकल मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, जिल्हा व सीमावर्ती भागात उभारण्यात आलेली तपासणी नाका, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी, एफएसटी टिममार्फत लोकसभा मतदार संघातीतल प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तपासण्या सुरु आहेत. जिल्ह्यास पुरेसे ईव्हीएम व व्हीव्हीपीटी मशीन उपलब्ध झाले असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या संपूर्ण तयारीची माहिती त्यांनी सादरीकरणाद्वारे दिली आहे.

Dhule pudhari.news

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप चे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्ह्यात मतदानाची आकडेवारी वाढण्यासाठी जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या व यापुढे राबविणार असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच राज्य निवडणूक आयुक्त यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात गृहभेटी उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा पोलीस अधिक्षक धिवरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पथकामार्फत अवैध दारु, ताडी, हातभट्टींवर कारवाई करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याभरात आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगारांवर विविध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात येत आहे, तसेच आयोगाच्या निर्देशानुसार परवाना धारकांकडील शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून करण्यात आलेल्या कारवाईची त्यांनी यावेळी माहिती दिली.

Dhule pudhari.news

उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविक केले. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक निवडणूक अधिकारी राहुल जाधव (धुळे ग्रामीण), महेश जमदाडे (शिंदखेडा), सीमा अहिरे (धुळे शहर), बबन काकडे (बागलाण), नितीन सदगीर (मालेगाव बाह्य), पल्लवी निर्मळ (मालेगाव मध्य) सहाय्यक पोलीस अधीक्षक रुषीकेश रेड्डी यांचेसह सर्व नोडल अधिकारी, सर्व तहसिलदार उपस्थित होते.

मुख्य निवडणूक निरीक्षकांची स्ट्रॉग रुमला भेट
धुळे लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय मुख्य निवडणूक निरीक्षक (सामान्य) पूर्ण चंद्र किशन यांनी आज नगावबारी परिसरातील धान्य गोडाउन येथील स्ट्रॉग रुमला भेट देऊन धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनच्या जागेची पाहणी केली. तसेच मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी करुन तेथील सुरक्षिततेचा आढावा घेतला. गोडाऊन परिसराच्या ठिकाणी उपलब्ध करुन द्यावयाच्या आवश्यक सोयीसुविधा तसेच सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत त्यांनी यंत्रणेला सुचना दिल्या.

Back to top button