नाशिक : गोदाघाटावरील सकाळ होणार सुरेल ; ‘सुबह-ए-बनारस’च्या धर्तीवर उपक्रम | पुढारी

नाशिक : गोदाघाटावरील सकाळ होणार सुरेल ; ‘सुबह-ए-बनारस’च्या धर्तीवर उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धार्मिक आणि पर्यटन या दोन्हीदृष्ट्या सर्वत्र नावलौकिक असलेल्या नाशिकच्या गोदाघाटाची प्रत्येक सकाळ आता सुमधूर संगीताने सुरेल होणार आहे. वाराणसीतील ‘नमामि गंगा’ प्रकल्पांतर्गत ‘सुबह-ए-बनारस’च्या धर्तीवर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या गोदाघाटावर आता नाशिककरच नव्हे, तर देशभरातून येणार्‍या भाविक, पर्यटकांच्या कानी सुमधूर संगीत पडणार आहे.

गोदावरी नदी नाशिक महापालिका क्षेत्रातून तब्बल 19 किमीचा प्रवास करते. नाशिकला गोदाकाठी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यामुळे नाशिकचे नाव भारतातच नव्हे, तर जगाच्या नकाशावर आले आहे. अस्थिविसर्जनासह विविध धार्मिक विधींसाठी देशभरातून भाविक, पर्यटक नाशिकमध्ये येत असतात. रामकुंडात स्नान केल्यास पापक्षालन होत असल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. परंतु, काही वर्षांमध्ये नागरिकांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नदी प्रदूषणात वाढ होत आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींतील औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रित सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने प्रदूषणात भर पडू लागली आहे. मनपाचे मलनिस्सारण केंद्रातही सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया होत नसल्याने पाणी तसेच नदीत सोडले जाते. नदीचे आंघोळीच्याही लायक नसल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने एका प्रकरणात सांगितले आहे. ही बाब सर्वांसाठीच दुर्दैवी आहे.

वाराणसीत गंगेच्या प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने केंद्र सरकारने ‘नमामि गंगा’ योजना राबविली. त्या धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी नदीला पुनरुज्जीवन प्राप्त व्हावे, या अनुषंगाने ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापौर कुलकर्णी यांनी घेतला आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्या दृष्टीने तयारी केली जात असून, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे रविवारी (दि.13) भूमिपूजन होत आहे. गोदाकाठी या उपक्रमाचे आयोजन करून एक प्रकारे नाशिकमधील स्थानिक कलावंतानादेखील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा महापौर कुलकर्णी यांचा मानस आहे. त्यामुळे या उपक्रमाद्वारे स्थानिक गायक, वादक यांना कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

वाराणसी येथील ‘सुबह-ए-बनारस’च्या धर्तीवर नाशिकमध्येदेखील गोदावरी नदीच्या काठी रामकुंड या पवित्र स्थानी दररोज सकाळी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. त्याबाबत नियोजन करण्यात येत असून, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
– सतीश कुलकर्णी, महापौर

हेही वाचा :

Back to top button