Onion News | निर्यात शुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्व नाही, दोन पैसै पदरात पडू द्या शेतकऱ्यांची सरकारला साद | पुढारी

Onion News | निर्यात शुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्व नाही, दोन पैसै पदरात पडू द्या शेतकऱ्यांची सरकारला साद

पिंपळनेर, (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली होती. त्यावेळी कांद्याचे दर नियंत्रणात होते. मात्र, कांद्यावरील निर्यात खुली होताच कांद्याचे दर पुन्हा एकदा क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांनी वाढले आहेत. मात्र, निर्यात पूर्णपणे खूली करुन निर्यात शुल्काची अट ठेऊ नये अशी मागणी शेतकरी करत आहेत. निर्यात शुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्व नाही, दोन पैसै पदरात पडू अशी साद शेतकऱ्यांनी सरकारला घातली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव तब्बल 500 रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पिंपळनेर खासगी बाजार समितीत शनिवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याला 1800 रुपये प्रतिक्विंटल भाव होता तर सरासरी 1500 ते 1700 प्रतिक्विंटल असा भाव होता. निर्यातबंदी हटवल्याने कांद्याचे भाव प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. परंतु हा निर्णय आधी घेतला असता तर शेतकऱ्यांना यापेक्षाही अधिक फायदा झाला असता असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला माल विकून टाकलेला असून आता बाजारात येणारा कांदा अल्प प्रमाणात राहणार आहे.

शेतकऱ्यांमधून निर्णयाचे स्वागत

दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कांद्याचे भाव आणखीच वाढले, तर शेतकरी स्टॉक केलेला कांदा बाजारात आणतील त्यामुळे मागच्यावेळी कवडीमोल दराने मिळालेल्या भावाची यात थोडीफार कसरत भरून निघेल असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटले आहे. सध्याचा भाव चांगला असून शेतकरी कांदा विक्री करीत आहेत तर काही शेतकरी येणाऱ्या दिवसांमध्ये कांद्याचे भाव अजून वाढतील असा अंदाज शेतकरी घेत आहेत.

दरम्यान, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता.

▪️कांदा निर्यात सुरू आहे किंवा नाही हे देखील नीट स्पष्ट होत नाही, कारण की कांद्याचे दर एका दिवशी वाढतात तर दुसऱ्या दिवशी कमी होतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांदा विकावा तरी केव्हा, असा संभ्रम निर्माण झालेला आहे. तरी सरकारने कांदा निर्यात पूर्णपणे खुली करावी व शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडू द्यावेत.
राजेंद्र खैरनार, शेतकरी चिकसे, ता.साक्री

▪️निर्यात सुरू आहे पण निर्यात शुल्क जास्त असल्याने निर्यातीला महत्त्व नाही. यामुळे शनिवारी भाव वाढले होते, पण आज कांद्याचे भाव उतरले आहेत- प्रा. किरण कोठावदे कांदा व्यापारी पिंपळनेर

▪️केंद्र सरकारने लादलेली निर्यात बंदीच मुळात चुकीची होती. संपूर्ण कांदा निर्यात बंदी करण्याऐवजी काही कालावधीसाठी काही अटी शर्तीसह निर्यात सुरूच ठेवली असती तर लाल कांद्यासह रब्बी हंगामातील यापूर्वी विक्री झालेल्या शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळाले असते.आता केंद्र सरकारने साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य लागू करून निर्यातीला सशर्त परवानगी दिली आहे. ऐनवेळी वेगवेगळ्या देशाशी करार करून कांदा निर्यात करणे हे आता निर्यातदारांपुढे मोठे आव्हान असणार आहे. सरकारने कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यात धोरण तयार करणे अत्यंत गरजेचं आहे. संजय भदाणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

हेही वाचा –

Back to top button