नाशिक : इतरांसाठी जगणे हेच खरे जगणे : राजेश टोपे ; गोदावरी गौरव पुरस्कारांचे वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीचा दोन वर्षे सगळ्यांनी अनुभव घेतला. या काळात अनेकांना कडू आठवणी आल्या. मात्र, याही परिस्थितीत अनेकांनी समाजासाठी आपण काही लागत असल्याचे भान ठेवून लोकसेवेचे व्रत जपले. ज्ञानाला कर्माची जोड देणे आवश्यक असते. इतरांसाठी जगणे हेच खरे जगणे असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

शहरातील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, विश्वस्त हेमंत टकले, उपाध्यक्ष संजय पाटील, प्रकाश होळकर, राजेंद्र डोखळे, अॅड. अजय निकम, सल्लागार विश्वस्त अॅड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, रंजना पाटील आदी उपस्थित होते. कुसुमाग्रजांनी साहित्यातून सुसंस्कृत समाज घडविण्यात योगदान दिले आहे. त्यांनी समाजाला दिशा दाखविण्याचे काम केले. कुसुमाग्रजांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणूस राहिला आहे. त्याच धर्तीवर कोरोना महामारीत सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शासनाने काम केले. त्यामुळे या पुरस्काराचे खरे मानकरी सर्व कोरोनायोद्धा असल्याचे ना. टोपे यांनी सांगितले.
ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावण्याचा प्रकार महाराष्ट्रात घडला नाही. राज्य शासनाने वास्तव मांडले. प्रशासनाने बडगा न उगारता सुसंवादातून कोरोना काळातील सगळ्या आघाड्यांवर मात केली. संकटांकडे आव्हाने म्हणून न बघता संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे ना. टोपे यांनी सांगितले. शिल्पा देशमुख यांनी सूत्रसंचालन, तर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले.
.. तर जिल्हा निर्बंधमुक्त :
नाशिक जिल्ह्यात कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. विशेषत: मालेगाव आणि ग्रामीण भागात लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. नाशिककरांनी वेग वाढून 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्टे गाठावे. तसे झाल्यास तत्काळ नाशिक जिल्हा निर्बंधमुक्त केले जाईल. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
यंदाचे पुरस्कारार्थी :
लोकसेवा क्षेत्रात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, नाट्यक्षेत्रात दिग्दर्शक अतुल पेठे, चित्र क्षेत्रात प्रसिद्ध चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन, संगीत क्षेत्रात ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर, ज्ञान-विज्ञान क्षेत्रात भौतिकशास्त्र संशोधक प्रा. डॉ. हेमचंद्र प्रधान, साहस क्षेत्रात इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील सीताबाई काळू घारे.
सर्वसामान्य दारिद्य्र पटकन लक्षात येते. मात्र, सांस्कृतिक दारिद्य्र कळत नाही. थिएटर्स शहराचे ऑक्सिजन प्लँट आहेत. कोरोना काळात कलाकारांची पुरती धुळधाण झाली आहे, याकडे समाजाने लक्ष देण्याची गरज आहे. प्रेक्षकांनी सृजनशील मने ठेवावी.
– अतुल पेठे, पुरस्कारार्थी तथा दिग्दर्शक