मणिपूरमध्ये भाजपची बाजी | पुढारी

मणिपूरमध्ये भाजपची बाजी

इंफाळ :  वृत्तसंस्था : उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा या राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असताना भाजपने मणिपूरमध्येही विधानसभा निवडणूकी 32 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपशी थेट सामना असलेल्या काँग्रेसचा धुरळा उडाला आहे. मणिपूरमध्ये बहुमतासाठी 31 जागांची गरज आहे.

राज्यात भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने मणिपूरमध्ये सत्ता हस्तगत केली असून भाजपने देशाच्या ईशान्य राज्यातही पुन्हा कमळ फुलवण्याची किमया साधली आहे.

मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचे सरकार होते. यंदाही भाजपचेच सरकार मणिपूरमध्ये येत असल्याचे चित्र होते आणि ते भाजपने साध्यही करून दाखवले. भाजपचा थेट सामना असलेल्या काँग्रेसची खूपच वाईट अवस्था झाली आहे.

प्रमुख विजयी उमेदवार

  • निगाँगमध्ये भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री एन.बीरेन सिंग यांनी 17 हजारपेक्षा अधिक मतांनी काँग्रेसचे के.पी. शरतचंद्र सिंह यांचा पराभव केला.
  • थोऊबाल : 2002 तेे 2017 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मुख्यमंत्री राहिलेले ओकराम इबोबी सिंह यांनी भाजपचे के.एल. बसंता सिंह यांना 2 हजार 543 मतांनी हरवले.
  • युरिपोकमध्ये भाजपचे के. रघुमणी सिंह यांनी नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री जॉयकुमार सिंह यांना 909 मतांनी पराभूत केले.
  •  माओ येथे नागा पीपल्स फ्रंटचे नेते आणि विद्यमान सरकारमधील मंत्री लॉसी दिकहो यांनी अपक्ष उमेदवार वोबा जोराम यांचा 8 हजार 513 मतांनी पराभव केला.
  • सिंगजामेईमध्ये विद्यमान विधानसभा सभापती भाजपचे यू.खेमचंद सिंह यांनी काँग्रेसचे रोमेन सिंह यांना पराभूत केले आहे.

Back to top button