टोकियो : भुताचा ‘किलिंग स्टोन’ फुटल्याने जपानमध्ये दहशत! | पुढारी

टोकियो : भुताचा ‘किलिंग स्टोन’ फुटल्याने जपानमध्ये दहशत!

टोकियो : कोरोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच जग त्रस्त आहे. अशातच जपानमधील लोकांच्या भीतीत आणखी भर पडली आहे. त्याचे कारण मात्र अजबच आहे. जपानमध्ये ‘किलिंग स्टोन’ नावाचा एक दगड होता. या दगडात एक दुष्ट आत्मा वास करते असा तिथे समज होता. आता हा दगड रहस्यमयरीत्या फुटल्याने हा दुष्टात्मा बाहेर पडला आहे व काही तरी अनर्थ घडणार, असा तेथील लोकांचा समज झाला आहे. त्यामुळे तेथील लोक सध्या भयग्रस्त आणि चिंताग्रस्त बनले आहेत!

जपानच्या नासू येथे हा दगड होता. त्याचे नाव ‘सेशो-सेकी’. एका दंतकथेनुसार या दगडात गेल्या एक हजार वर्षांपासून दुष्ट आत्म्याचा वास होता. या दगडाच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीचा मृत्यू होतो असेही म्हटले जात असे. एका दंतकथेनुसार या दगडामध्ये कोल्ह्याच्या रूपातील एक दुष्ट आत्मा राहत होता.

या कोल्ह्याला नऊ शेपटी होत्या. या कोल्ह्याने ‘तमामो-नो-माई’ नावाच्या महिलेचे रूप धारण केले आणि तिने समट टोबा याची हत्या करण्याचा कट रचला. मात्र, ती हरली आणि तिचा आत्मा या दगडात अडकून पडला. हा रहस्यमय दगड नासूमधील ज्वालामुखीच्या टेकडीवर आहे. 1957 पासून हे ठिकाण एक ऐतिहासिक स्थळ म्हणून नोंदवलेले आहे.

गेल्या रविवारी हा दगड दोन तुकड्यांमध्ये दुभंगून पडलेला दिसून आला. त्याच्या चारही बाजूंनी बांधलेला दोरखंडही तुटला होता. त्यामुळे आता या दगडातून दुष्ट आत्मा बाहेर पडला असून त्याच्यामुळे अनर्थ ओढवणार अशी भीती जपानी लोकांना वाटत आहे.

Back to top button