सातार्‍यात पुनर्रचनेमुळे प्रभागांत फाटाफूट | पुढारी

सातार्‍यात पुनर्रचनेमुळे प्रभागांत फाटाफूट

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेत सर्व प्रभागांची फाटाफूट झाली आहे. हद्दवाढ झाल्याने सर्व प्रभागांची पुनर्रचना झाल्याने जुने प्रभाग आता नव्या दोन ते तीन प्रभागांत विभागले गेले आहेत. प्रभाग फुटल्याने निष्क्रिय नगरसेवकांची गोची होणार आहे. काही ठिकाणी मात्र ही पुनर्रचना काहीजणांच्या पथ्यावर पडली आहे. सातार्‍यात एकूणच ‘कहीं खुशी-कहीं गम’ असे चित्र आहे.

सातारा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने नगरसेवकांची आणि इच्छुकांचीही धाकधूक वाढली आहे. प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने नगरसेवकांना निवडणुकीच्यादृष्टीने काही मनसुबे आखता येतील. मात्र, नव्या प्रभाग रचनेमुळे अनेकांच्या आनंदावर विरजणही पडले आहे. सातारा हद्दवाढीमुळे सर्व 25 प्रभागांची पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे अनेक जुने प्रभाग फुटले आहेत. एक-दोन जुने प्रभाग बदलामुळे नव्या तीन प्रभागांत विभागले गेल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे या ठिकाणी नव्या प्रभागात काम करताना आणि निवडणुकीला सामोरे जाताना इच्छुकांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. जवळपास सर्वच जुन्या प्रभागांच्या हद्दी बदलल्या असून, एकेक प्रभाग दोन ते तीन नव्या प्रभागांत विभागला गेला आहे. आपल्याच प्रभागात आणि आपल्याच परिसरापुरता विकास करणारे आणि त्यातही जवळच्याच लोकांची कामे करणार्‍या नगरसेवकांची आता गोची झाली आहे. अशा नगरसेवकांना निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सध्या असलेल्या द्विसदस्यीय प्रभाग रचनेत दोन नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. या रचनेमुळे काही नगरसेवकांनी जबाबदारी झटकली. त्यामुळे दुसर्‍या सहकारी नगरसेवकावर कामाचा
ताण आला.

अशा निष्क्रिय नगरसेवकांपुढील अडचणी वाढल्या आहेत. प्रभागात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कधीही न फिरणार्‍या नगरसेवकांना आगामी निवडणूक जड जाणार हे निश्चित आहे. काही दिग्गजांचे प्रभाग बदलल्यामुळे ते इतर ठिकाणाहून लढण्याची शक्यता आहे. अशावेळी नव्यांना संधी मिळू शकते. प्रतिस्पर्ध्याचा प्रभाग फुटल्याने ही प्रभाग पुनर्रचना मात्र इच्छुकांच्या पथ्यावर पडली आहे. सातार्‍यातील काही नगरसेवकांनी उल्लेखनीय काम केले. त्यांनी प्रभागांच्या हद्दींचा विचार न करता नागरिकांची कामे केली. त्यातून त्यांचा लोकसंपर्क वाढला.

प्रभागाशिवाय शेजारील प्रभागातही त्यांनी कामे केली. त्याठिकाणी नागरिकांनाही सहकार्य केले. असे नगरसेवक त्या भागात चांगलेच सेट झाले आहेत. प्रभाग आणि शहरातही त्यांच्या कामाची चर्चा आहे. त्यामुळे प्रभाग पुनर्रचना झाली तरी अशा नगरसेवकांना आगामी निवडणूक जाचणार नाही हे स्पष्ट आहे.

आगामी राजकीय गणितांचा विचार करुन नगरसेवक प्रभागांमध्ये कामे करत असतात. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पाच वर्षे केलेल्या कामावरच पुढील राजकी वाटचाल अवलंबून असते. निवडणुकीला सामोरे जाताना ही विकासकामेच त्यांचे प्रगतीपुस्तक असते. मात्र प्रभागांच्या पुनर्रचनेमुळे प्रभागांमध्ये फाटाफूट झाल्याने डोकेदुखी वाढली.

आता प्रभागरचना बदलली असली तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत नगरसेवकांना व इच्छुकांना नव्या प्रभाग रचनेनुसार त्या त्या परिसरात काम करण्याची संधी आहे. मात्र प्रभागाचे आरक्षण काय असेल, आघाड्या किंवा पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी पुन्हा संधी मिळेल का? याची चिंता अनेकांना सतावत आहे.

Back to top button