Gondiya : तर… विद्यार्थी राहणार शिक्षणापासून वंचित ! | पुढारी

Gondiya : तर... विद्यार्थी राहणार शिक्षणापासून वंचित !

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया जिल्ह्यातील शाळांच्या UDISE २०२३-२४ च्या स्थितीनुसार १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन नजीकच्या अधिक पट असलेल्या शाळांत त्या पटांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल क्षेत्रातील अनेक शाळा बंद होऊन या शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या निर्णयाला स्थगिती देवून जैसे थे ठेवण्यात यावे, असा आग्रह माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्याकडे केला. तर तसे निवेदन देत त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीवही करुन दिली.

माजी मंत्री बडोले यांनी मंगळवार (दि.७) रोजी, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्यास स्थगिती देऊन, या शाळा पुर्ववत सुरू ठेवण्याची विनंती केली. विशेष म्हणजे १२ एप्रिल रोजी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र काढून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा नजीकच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याबाबत सर्व मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे.

या पत्रानुसार गोंदिया जिल्ह्यातील १८५ शाळा समाविष्ट आहेत. मात्र, या शाळा अतिशय दुर्गम भागातील आणि बहुतांश आदिवासी ग्रामीण भागातील असल्याने सदर शाळा बंद झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी त्रास होईल. परिणामी त्यांच्या शिक्षणात अडचण होऊन अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून सदर शाळा पुर्ववत सुरू ठेवण्यात याव्यात असा आग्रह माजीमंत्री‌ बडोले यांनी निवेदनातून केला आहे. यावेळी प्रधान सचिव कुंदन यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन बडोले यांना दिले.

हेही वाचा :

Back to top button