नाशिक : कोविड केअर सेंटरमधील साहित्याचा होणार लिलाव, मनपा आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिक : कोविड केअर सेंटरमधील साहित्याचा होणार लिलाव, मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता महापालिकेने शहरात उभारलेले सर्वच कोविड केअर सेंटर गुंडाळण्याच्या तयारी आहेत. त्यानुसार या सेंटर्ससाठी खरेदी करण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे वगळता बेड, गाद्यांसह उर्वरित सर्व साहित्यांचे लिलाव महापालिका करणार आहे. याबाबत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी बांधकाम विभागाला तसे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना महामारीची चौथी लाट आल्यास त्यावर मनपा पुन्हा कोट्यवधींचा खर्च करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे येणारी तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षाही भयावह असेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात ओमायक्रॉन विषाणू कमी घातक ठरला. प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने तिसरी लाट नुकसानकारक ठरली नाही. सध्या शहरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णाची संख्या 100 च्या आत आहे. त्यापैकी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात अवघ्या एक, तर नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळेच वैद्यकीय विभागाने या दोन्ही रुग्णालयांचा कोविड रुग्णालयाचा दर्जा काढून घेतला असून, शहरात उभारण्यात आलेली कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. समाजकल्याण वसतिगृहातील कोविड सेंटर याआधीच बंद करण्यात आले आहे.

येत्या 14 मार्च रोजी मीनाताई ठाकरे स्टेडियम व ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार आहे. मेरी येथील सेंटर बंद करून इमारत हस्तांतरित करण्यात येणार आहे. कोविड सेंटर्स बंद करण्यात आल्यानंतर तेथील साहित्याचे काय करायचे तसेच संबंधित इमारतींचाही वापर त्या यंत्रणांकडून सुरू असल्याने इमारतीतील साहित्याचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच या साहित्याचा लिलाव करण्याचे निर्देश आयुक्त कैलास जाधव यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button