National Highway : ‘बेळगाव-पणजी’ मार्गाची लवकरच वर्कऑर्डर | पुढारी

National Highway : ‘बेळगाव-पणजी’ मार्गाची लवकरच वर्कऑर्डर

खानापूर : पुढारी वृत्तसेवा
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गा पैकी खानापूर ते अनमोडपर्यंतचे काँक्रिटिकरणाचे काम वनखात्याच्या एनओसीअभावी ठप्प झाले होते. तथापि, केंद्रीय वन मंत्रालयाने महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2022 पर्यंत वनविखात्याच्या एनओसीची मर्यादा वाढवली असून उर्वरित कामाची लवकरच वर्क ऑर्डर दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.

पहिल्या टप्प्यावेळी महामार्गाच्या कामाला वन खात्याने दिलेल्या एनओसीची मुदत संपुष्टात आली होती. त्यामुळे महामार्गाचे उर्वरित काम सुरू करण्यापूर्वी केंद्रीय वन मंत्रालयाकडून एनओसीला मुदतवाढ देण्याची नितांत गरज होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रक्रिया पूर्ण करून एनओसीला मुदतवाढ घेतली आहे. पण ही मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्ते, पूल व मोरींचे अर्धवट राहिलेले काम पूर्णत्वाला नेण्यासाठी महामार्गाच्या उर्वरित कामांच्या निविदा प्रक्रियेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. कामासाठी दाखल झालेल्या निविदांचे मूल्यमापन केले जात असून लवकरच वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. बेळगाव-पणजी महामार्ग संदर्भातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे गडकरी यांनी पत्रात सांगितले आहे. याप्रश्नी बेळगाव भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी पाठपुरावा केला होता.

दुरुस्ती, देखरेखीच्या कामांनाही मंजुरी
2019-20 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या खानापूर-रामनगर रस्त्यावरून वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी अल्प मुदतीच्या दुरुस्ती कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी अनुदानही वितरित करण्यात आले असून हे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

Back to top button