इस्लामपूर: बांधकाम साहित्य दरात प्रचंड वाढ | पुढारी

इस्लामपूर: बांधकाम साहित्य दरात प्रचंड वाढ

इस्लामपूर पुढारी वृत्तसेवा: बांधकाम साहित्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे नवे घर बांधणे सामान्य लोकांच्या अवाक्याबाहेर जाणार आहे. या महागाईमुळे बांधकाम क्षेत्रातही बंदी येऊन सुरू असलेली बांधकामे बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. साहित्यांचे दर गगनाला गेल्याने नवीन बांधकाम करणारेही थांबले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचे कारण देत ही भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी 60 ते 65 हजारांवर असलेले स्टीलचे दर 80 हजारांवर गेले आहेत. सिमेंट 400 रुपये पोते, वाळू 9 ते 12 हजार रुपये ब्रास, खडी व दगड 2500 ते 6000 ब्रासपर्यंत गेले आहेत. अन्य बांधकाम साहित्याचेही दर अनेक पटीने वाढले आहेत.

या अचानक झालेल्या दरवाढीला युद्धाचे कारण दिले जात आहे. वाढीव दराने या वस्तू खरेदी करताना लोकांचे संपूर्ण आर्थिक बजेटच कोलमडून जाणार आहे. शिवाय नव्या घराचे स्वप्न पाहणार्‍यांचे दिवास्वप्न ठरेल, अशी भीती निर्माण झाली आहे. दरवाढीने मजुरीही वाढणार आहे.

अनुदान वाढविण्याची गरज…

एकीकडे बांधकाम साहित्य व मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे घरांचे बजेटही वाढते आहे. शौचालय – बाथरूम बांधले तरी बजेट लाखाच्या पुढे जाते. मात्र शासनाकडून घरकुल योजनेसाठी केवळ 1 लाख 38 हजार रुपये अनुदान मिळते. महागाईच्या प्रमाणात अनुदानातही वाढ गरजेची आहे.

Back to top button