नाशिक : आयटीचा मुहूर्त पार पडला ; आता मूर्तरुप यावे | पुढारी

नाशिक : आयटीचा मुहूर्त पार पडला ; आता मूर्तरुप यावे

नाशिक : सतीश डोंगरे ; नाशिकमध्ये आयटी इंडस्ट्रीला रेडकार्पेट उपलब्ध करून देण्याचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. त्याचे उद्घाटन करून पहिला टप्पाही पार केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. पण, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आयटीची मुहूर्तमेढ रोवण्याचा गाजावाजा केला गेल्याने, शंकेला वाव आहे. त्यामुळे आयटी हबला लवकर मूर्तरूप यावे, अशी भावना नाशिककरांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

नाशिकचे वातावरण, उपलब्ध पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जाळे, आयटी कंपन्यांची संख्या लक्षात घेता नाशिकमध्ये आयटी क्षेत्र वृद्धिंगत होण्यास वाव आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेपायी अद्यापपर्यंत नाशिकमध्ये आयटीला नो एंट्री होती. पण, दस्तुरखुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच आयटी हबला ड्रीम प्रोजेक्ट बनविल्याने, पुन्हा एकदा नाशिकमध्ये आयटी हबची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेल्याने, आता नाशिककरांनाही आयटी हबचे स्वप्न पडायला लागले, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. नाशिकमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये भरच पडत आहे. कॉम्प्युटरसह संगणक शाखांमधून अभियांत्रिकी, बीसीए, बीसीएस यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून हजारो विद्यार्थी बाहेर पडतात. त्यानंतर मुंबई, पुण्यासह बंगळुरू या शहरामध्ये नोकरीच्या शोधात भटकंती करतात.

खरं पाहता नाशिकमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. मात्र, येथील कौशल्य नाशिकमध्ये कामी येत नसल्याचे शल्य आहे. अशात होऊ घातलेल्या आयटी हबच्या माध्यमातून या गुणवत्तेचा लाभ नाशिकला होईल यातही शंका नाही. सद्य स्थितीत नाशिकमध्ये एसडीएस, डब्ल्यूएनएस, डेटामेट्रिक्स यांसह अनेक आयटी कंपन्यांच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते आहे. ईएसडीएसने नाशिकसह देशातील विविध महत्त्वपूर्ण शहरांमध्ये त्याचबरोबर व विदेशातही आपला विस्तार केला आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार मिळाला आहे. जर आणखी काही मोठ्या आयटी कंपन्या नाशिकमध्ये आल्यास, नाशिकसह राज्यातील कानाकोपर्‍यातील अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.

सध्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आयटी पार्कचा विषय बर्‍यापैकी मार्गी लागताना दिसत आहे. जागेचा प्रश्न दूर झाला असतानाच इतर प्रशासकीय मान्यतेलाही काही अडचण येणार नसल्याचे दस्तुरखुद्द केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यममंत्री नारायण राणे यांनी स्पष्टोक्ती दिली. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, कुंभथॉनसारख्या चळवळीमुळे युवकांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यात यश आले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये नाशिकमधून अनेक स्टार्टअप्स सुरू झाले; परंतु गुंतवणूकदारांच्या कमतरतेमुळे यापैकी काही स्टार्टअप्स दीर्घकाळ तग धरू शकले नाहीत. आयटी क्षेत्राच्या विकासाचा विचार करताना स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण आणखी क्रमप्राप्त ठरेल. त्यासाठी आयटी हब गरजेचे असून, त्याला मूर्तरूप कधी मिळेल? याकडे नक्कीच नाशिककर लक्ष ठेवून असणार आहेत.

आयटी हबचा असाही कलंक
शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी 2007 मध्ये आयटी हबची घोषणा केली होती. त्यांची ही घोषणा हवेतच विरली. मात्र, जमिनीला अवाच्या सवा भाव मिळवून गेले. जमिनीचे भाव वाढल्याने, नाशिकमधील रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठे आमूलाग्र बदल होत गेले. त्यामुळे जमिनीचे भाव वाढविण्यासाठीच ही घोषणा केली गेली होती काय? अशीही चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिककरांना आयटी हबचे स्वप्न दाखविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकमधील जमिनीचे दर वाढण्याची शक्यता आहे. ज्या भागात आयटी हब होणार आहे, तेथील जमिनीच्या दरांनी आताच उसळी घेतली आहे. आजूबाजूच्या परिसरातील जमिनीच्या दरांनीही अचानक उसळी घेतली आहे. त्यामुळे आयटी हब होणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा जमिनीचे भाव वाढविण्यासाठीच आयटी हबचा घाट घातला की काय? हा कलंक या महापौरांच्याही माथी लागू नये, हीच अपेक्षा.

हेही वाचा :

 

Back to top button