पावसाने केला राजस्थानचा घात | पुढारी

पावसाने केला राजस्थानचा घात

गुवाहटी; वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला. अनेक तास वाट पाहूनही मैदान खेळण्यायोग्य नसल्याने एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. त्यामुळे हा सामना जिंकून दुसर्‍या क्रमांकावर जाण्याचे आणि क्वालिफायर -1 फेरी खेळण्याचे राजस्थानचे स्वप्न भंगले. ते गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यांना आता बुधवारी रॉयल चॅलेजर्सविरुद्ध खेळावे लागेल, तर कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनरायझर्स यांच्यात क्वालिफायर-1 लढत होईल.

गुवाहाटीमध्ये रात्री पावणेनऊ वाजता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मैदानावरील कव्हर्स हटवण्यात आले होते; परंतु काही वेळातच पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. 10.15 वाजता कव्हर्स काढून मैदान सुकवण्याचे काम सुरू झाले. 10.25 ला खेळपट्टीची पाहणी केली गेली. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 7-7 षटकांचा हा सामना होणार होता आणि 10.45 ला मॅच सुरू होणार होता; परंतु टॉसनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मॅच रद्द केली गेली.

राजस्थानला क्वालिफायर-1 मध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. तेच केकेआरने 19 गुणांसह क्वालिफायर-1 मधील जागा पक्की केली आहे. हैदराबादने त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकून 17 गुणांसह दुसर्‍या स्थानी झेप घेतली. त्यामुळे क्वालिफायर-1 सामना खेळण्यास राजस्थानला हा सामना जिंकणे गरजेचे होते. पहिल्या 8 सामन्यांत 7 विजय मिळवून राजस्थानने लीगची सुरुवात दणक्यात केली होती; परंतु मागील चार सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आणि त्यांची गाडी अडकली. 14 सामन्यांत 8 विजय मिळवून 17 गुणांसह त्यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कारण सनरायझर्स हैदराबादचा नेट रनरेट हा 0.414 असा असल्याने ते क्वालिफायर-1 साठी पात्र ठरले.

Back to top button