नाशिक : संकटमोचक पुन्हा महापालिकेच्या दारी | पुढारी

नाशिक : संकटमोचक पुन्हा महापालिकेच्या दारी

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ ; भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे मध्यंतरी महापौरपदाच्या निवडणुकीनंतर नाशिकपासून पूर्णपणे अलिप्त होते. परंतु, आता महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच संकटमोचकाला भाजपने प्रभारीपद देत एक प्रकारे महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. याआधीचे नाशिकचे प्रभारी असलेले जयकुमार रावल यांची पक्षाच्या दृष्टीने कामगिरी होऊ न शकल्यानेच त्यांना दूर सारत महाजन यांच्याकडे नाशिकची सूत्रे सोपविण्यात आली असून, रावल यांची नाराजी सांभाळण्यासाठी सहप्रभारीपद देण्यात आले आहे.

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी सिक्स्टी प्लसची घोषणा केली होती आणि भाजपचे नाशिक महापालिकेत तब्बल 66 इतके नगरसेवक निवडून आले. महापालिकेच्या इतिहासात इतक्या जागा आतापर्यंत एकाही पक्षाला मिळविता आलेल्या नाहीत. आता नाशिकचे प्रभारीपद पुन्हा हाती आल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये आगमन झाले. या आगमनात त्यांनी नाशिक महापालिकेत 80 हून अधिक जागा निवडून आणणार असल्याची घोषणा केल्याने भाजपमधील कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांमध्ये नव्याने उत्साह संचारला आहे. अगदीच निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये काही प्रमाणात मरगळ निर्माण झाली होती.

मागील महिन्यात भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत गेल्याने भाजपमधून भीती व्यक्त केली जात होती. तीन नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे फडणवीसांना चेकमेट देण्याच्या उद्देशाने काही दिवसांनी लगेचच भाजपमधून नगरसेवक हेमलता कांडेकर, सीमा ताजणे, प्रथमेश गिते यांचा शिवसेनेने प्रवेश करवून घेतला. अजूनही काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच त्याला ब्रेक लावण्यासाठी भाजपने आपले ‘संकटमोचक’ नावाचे अस्त्र बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे महाजन यांच्या नुसत्या नियुक्तीनेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, इतर पक्षांच्या वाटेवर असणार्‍यांना ब—ेक लागण्याची शक्यता आहे. महाजनांनी संकटमोचक असल्याची चुणूक महापौरपदाच्या निवडणुकीत पुन्हा दाखवून दिली. भाजपच्या हातून महापौर खेचून आणणारच, असा विरोधकांनी चंगच बांधला होता. त्यानुसारच मोर्चेबांधणी झाली होती. परंतु, महाजन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्रीच राजकीय समीकरणांची तोडफोड करत भाजपकडेच आपले महापौर ठेवले.

भाजपचे पक्षसंघटन मजबूत मानले जात असले, तरी अनेक जण सध्याच्या पदाधिकार्‍यांवर नाराज आहेत. महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात काही बाबी समोर आल्या. त्यापैकी एक म्हणजे शहराध्यक्ष पालवे यांनी पक्षाचे नेते विजय साने वगळता, स्वागतपर प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे न राहवून साने यांनी पालवे यांना थांबवत, मला बोलायचे आहे असे सांगत हातून माइक खेचून घेतला.

सेनेचे डॅमेज कंट्रोल रोखणार कोण?

आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होण्याची शक्यता गृहीत धरूनच भाजपने व्यूहरचना आखली आहे. आघाडी होवो अगर ना होवो, भाजपची टक्कर खर्‍या अर्थाने शिवसेनेबरोबरच रंगणार आहे. शिवसेनेतही उत्साह भरभरून असला, तरी अंतर्गत वाद हे निवडणुकीत प्रमुख कारण ठरू शकते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बाहेर पडण्याची धमकी देणार्‍यांना शिवसेनेकडून गोंजारले जात असल्याने पक्षासाठी ही बाबही त्रासदायक ठरू शकते. कारण उद्या कोणीही उठेल आणि पद वा उमेदवारी दिली नाही, तर पक्षातून बाहेर पडण्याची वा बंडखोरीची भाषा वापरली जाऊ शकते. शिवसेनेचे सध्याचे उपनेते सुनील बागूल यांच्याबाबतही ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. खरे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यातच बागूल यांचा भाजप प्रवेश मानला जात होता. परंतु, त्या पार्श्वभूमीवरच शिवसेनेने बागूल यांना उपनेतेपद बहाल करून डॅमेज कंट्रोल थांबवले. मात्र अंतर्गत वाद आणि गटबाजीमुळे होणारे शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल कोण आणि कसे रोखणार? कारण सध्या शिवसेनेत प्रत्येक जण पदाधिकारी आणि नेता आहे.

हेही वाचा :

Back to top button