Fireflies Festival: ‘काजवा महोत्सव’ला रात्री ९ नंतर पर्यटकांना का आहे ‘नो एंट्री’?

Fireflies
Fireflies

गंगापूर रोड, नाशिक : आनंद बोरा – गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या भंडारदरा धरण आणि कळसूबाई शिखर परिसरात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी असंख्य काजवे परिसरात लुकलुक करतात. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक भंडारदरा परिसरात येत असतात.

वळवाच्या पावसानंतर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजव्यांच्या मिलनाचा उत्सव सुरू होतो. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळ घातली की काय, असे दृश्य बघावयास मिळते. जगभरात काजव्यांच्या दोन हजार जाती आहेत. त्यापैकी सात ते आठ जाती भारतात आढळतात. कीटकांच्या कॉलियोपटेरा कुळात काजव्यांचा समावेश होतो. दरवर्षी मे ते जूनच्या दरम्यान काजव्यांचा मिलनाचा कालावधी असतो. मिलनानंतर नर काही दिवसांत मरून जातो तसेच मादी जमिनीखाली अंडी घालते आणि तीही मरून जाते. तीन ते चार आठवड्यांत अंड्यातून अळी बाहेर पडते. काजव्याचे आयुष्य अंडी, अळी, प्रौढ या चक्रातून जात असते. पण गेल्या चार-पाच वर्षांत पर्यटकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे या कीटकांच्या जीवनचक्रावर परिणाम होत आहे. त्यामुळे वनविभागदेखील सक्रिय झाले आहे.

अभयारण्यातील टोलनाक्यावर पोलिस विभागाकडुन वाहनांची तपासणीदेखील करण्यात येणार आहे. काजवा महोत्सवासंदर्भात शेंडी येथे वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, वनपाल शंकर लांडे, भास्कर मुठे, परिसरातील टेंटधारक व वन्यजीव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

या नियमांचे पालन करावे लागणार
वन-वन्यजीव विभागाच्या सर्व नियम अटीचे पालन करावे.
पर्यटकांनी त्यांची वाहने पार्किंगमध्येच उभी करावी.
काजवे ज्या झाडावर लुकलुकत असतील, त्या झाडापासून 50 फूट अंतर राखावे.
रात्री ९ नंतर पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश नाही.
रात्री १० च्या आत अभयारण्यातून बाहेर पडावे.
प्रवेश शुल्क आकारूनच अभयारण्यात प्रवेश मिळेल.
टेंट साइटवर बुकिंग केलेल्या पर्यटकांची नोंदवहीत नोंद सक्तीची.
वाद्य वाजविण्यास परवानगी नाही.
नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई.

महोत्सवाला पर्यावरणप्रेमींचा विरोध
काजवा महोत्सवाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध करण्यात आला आहे. काजवा महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांकडून निसर्गाचे नुकसान होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे हा महोत्सव रद्द करावा, यावर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.

जैव व्यवस्थेत, परागीभवनामध्ये काजव्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अभयारण्यात दोन

बाजूंनी प्रवेश दिला जातो, यासाठी आम्ही संरक्षक मजुरांची संख्या वाढवली आहे, एकूण 80 मुले आम्ही घेतली आहेत, जे गाडी पार्किंग करण्यापासून काजव्यांच्या जागी घेऊन जाणे असे काम करत असतात. – अमोल आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news