त्र्यंबकला ब्रम्हगिरी पर्वतावर लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक | पुढारी

त्र्यंबकला ब्रम्हगिरी पर्वतावर लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शहराजवळच्या पहिने शिवारातील ब्रम्हगिरी पर्वतावरील गवत पेटल्याने लागलेल्या आगीत 25 एकरांवरील शेकडो वृक्ष जळून खाक झाले. ग्रामस्थांनी प्रयत्नांची शर्थ करीत आग विझवली. या प्रकरणी घटनास्थळी आढळून आलेल्या दोघांसह सात जणांना वन विभागाने ताब्यात घेऊन हमीपत्र घेतल्यानंतर सोडून दिले. हे सर्व जण मूळ पश्चिम बंगाल राज्यातील असून, ते नाशिकच्या सराफ बाजारातील कामगार असल्याचे कळते.

मंगळवारी महाशिवरात्र असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी पहिने शिवारातील ब्रम्हगिरीच्या दक्षिण बाजूच्या डोंगरावरील गवताने अचानक पेट घेतला. धुराचे लोट निघू लागले. ते पाहून परिसरातील वस्त्यांवरील ग्रामस्थांनी धाव घेतली. डोंगरावरील वाळलेले गवत झपाट्याने पेट घेत होते. ग्रामस्थांनी प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. दरम्यान, घटनास्थळी दोन व्यक्ती आढळून आल्या. त्यांना पकडून तेथे आलेल्या वन कर्मचार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले. ते पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील असून, ते सध्या नाशिकच्या सराफ बाजारात कामगार म्हणून कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यासोबत आणखी पाच व्यक्ती असल्याचे आणि ते सर्व फिरायला आले असल्याचे समजले. वन अधिकार्‍यांनी पकडलेल्या दोघांची ओळख असलेल्या नाशिक येथील स्थानिक नागरिकांचे हमीपत्र लिहून घेत त्यांची सुटका केली. त्यांना त्यांचे आधारकार्ड आणून देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांचे नाव, गाव आदी माहिती हाती आल्यानंतर सर्व आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती वन खात्याने दिली.

या आगीत सुमारे 25 एकर वनक्षेत्र जळाले असून, शेकडो वृक्षांची राख झाली आहे. यात काही नवीन लागवड होती, तर काही जुने जंगल होते. भटकंती करण्यासाठी आलेले लोक वाळलेले गवत पेटवून देतात व त्यामुळे वृक्षांची हानी होत आहे. पावसाळा संपताच स्थानिक ग्रामस्थ जनावरांना चारा म्हणून गवत कापतात. मात्र, डोंगराच्या वरच्या बाजूस असलेले गवत तसेच राहते व त्यातून आगीच्या घटना घडतात.

जंगलाला आग लावणे हा गंभीर गुन्हा आहे. संबंधित संशयितांची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. माहिती आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार आहे.
– राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा :

Back to top button