पोस्ट कोव्हिड समस्या आणि समाधान

पोस्ट कोव्हिड समस्या आणि समाधान
Published on
Updated on

पोस्ट कोव्हिड समस्या आणि समाधान
परवा पन्‍नाशी ओलांडलेले एक गृहस्थ आले. महिन्यापूर्वी, म्हणजे जानेवारी 2022 मध्ये त्यांना कोव्हिडची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना फारसा त्रास नव्हता. घरीच औषधे घेऊन इतर अनेक जणांप्रमाणे तेही बरे झाले होते. त्यांच्या या कोव्हिड आजारपणाच्या काळात जेमतेम आठवडाभर विश्रांती घेऊन ते पुन्हा पूर्वीच्या जोमाने कामाला लागले. तीच पूर्वीची धावपळ, तीच पूर्वीची दगदग, वेळी-अवेळी जेवण, या सर्वांमध्ये थोडीशी धाप लागणे, थोडासा खोकला येणे याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. याशिवाय रक्‍त पातळ होण्याच्या गोळ्या त्यांनी घेतल्याच नाहीत. परिणामी, त्यांचा त्रास अचानक वाढला. धाप इतकी वाढली की, हॉस्पिटलमध्ये येण्यावाचून पर्याय उरला नाही.

तपासणी केल्यानंतर असे लक्षात आले की, फुप्फुसांमधील रक्‍तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झालेल्या आहेत आणि सुमारे 75 टक्के रक्‍तवाहिन्या बंद पडलेल्या आहेत. तातडीने त्यांना गुठळ्या विरघळविणारी औषधे दिली आणि मग त्यांची धाप कमी झाली. या रुग्णामध्ये केवळ एवढाच औषधोपचार देऊन भागणार नव्हते, तर पुढे बराच काळ रक्‍त पातळ होणार्‍या गोळ्या घ्याव्या लागणार होत्या. कोव्हिडनंतर जे वेगवेगळे आजार उद्भवतात त्यामध्ये रक्‍तात गुठळ्या होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात म्हणजे कोव्हिडच्या तिसर्‍या लाटेनंतरसुद्धा जास्त प्रमाणात दिसू लागले आहे. केवळ फुप्फुसांत रक्‍ताच्या गाठी होणे एवढेच नव्हे, तर हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांत गुठळ्या होऊन हार्टअटॅक येणे, मेंदूच्या रक्‍तवाहिन्यांत गुठळ्या होऊन शरीराचा अर्धा भाग लुळा पडणे, मूत्रपिंडे निकामी होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोव्हिडच्या तिसर्‍या लाटेत ओमायक्रॉन हा कोव्हिड व्हेरियंट अधिक प्रमाणात दिसून आला; पण काही काही ठिकाणी डेल्टा-कोव्हिडचे रुग्ण दिसून आले.

कोव्हिडनंतरच्या तक्रारींचे स्वरूप प्रत्येक रुग्णामध्ये भिन्‍न असते. कोणत्या अवयवांवर कोव्हिडचा तीव्र परिणाम झाला, यावर कोव्हिडनंतरचे परिणाम अवलंबून असतात. कोव्हिडनंतरच्या वेगवेगळ्या लक्षण समूहाला 'पोस्ट कोव्हिड सिंड्रोम' किंवा 'लाँग कोव्हिड' असे म्हटले जाते. कोव्हिडमधून रुग्ण बरे झाल्यानंतर काही आठवडे किंवा काही महिने पोस्ट कोव्हिड परिणाम राहतात. क्‍वचितप्रसंगी कुणाला वर्षभर या तक्रारी सतावतात. पोस्ट कोव्हिडमध्ये प्रचंड थकवा येतो. अशक्‍तपणा येतो. श्‍वास घेण्यास त्रास होतो. दम लागतो. छातीत दुखते. कोरडा खोकला येतो. छातीत धडधडते. पाठीत दुखणे, छातीत किंवा पाठीत मुंग्या येणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, डोके दुखणे, एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्‍ती काहीशी कमी होणे, अशाही तक्रारी आढळतात. निद्रानाश, अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे, केस गळणे अशीही लक्षणे अनेक रुग्णांमध्ये आढळतात.

पन्‍नासपेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांमध्ये तसेच ज्यांना आधीपासून हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्‍तदाब, दमा, संधिवात, सीओपीडी, इंटरस्टिसीअल लंग डिसीज किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्‍ती, तसेच ज्यांच्यात अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया झाली आहे, अशा रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड लक्षणे अधिक प्रमाणात आढळतात. स्थूल व्यक्‍ती, तंबाखू-मावा- गुटखाधारी, धूम्रपान, मद्यपान करणार्‍या व्यक्‍तींमध्येही पोस्ट कोव्हिड तक्रारी दिसून येतात. कोव्हिडनंतर रक्‍त पातळ राहण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्या सलगपणे घ्याव्या लागतात. ज्यांनी ही औषधे घेतली नाहीत, त्यांच्यात पोस्ट कोव्हिड परिणाम जास्त प्रमाणात दिसून येतात.

ज्यांना विशेष करून डेल्टा प्रकारच्या कोरोना विषाणूचा त्रास झाला त्या व्यक्‍तींमध्ये फुप्फुसांवरील परिणाम गंभीर असतात. 'पोस्ट कोव्हिड पल्मोनरी फायब्रोसिस' हा महत्त्वाचा विकार अशा रुग्णांमध्ये दिसतो. छातीचा एक्सरे, एचआरसीटी, पल्मोनरी फंक्शन टेस्ट तसेच 'डीएलसीओ' या तपासण्यांवरून पोस्ट कोव्हिड फायब्रोसिसचे निदान आणि तीव्रता समजते.पोस्ट कोव्हिड परिणाम टाळण्यासाठी आपली आधीची आणि कोव्हिडनंतरची औषधे नियमितपणे घ्यावीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराच्या कोणत्याही बारीक-सारीक तक्रारींकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.

पोस्ट कोव्हिड मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करू नये. त्यासाठी समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांचा नियमित सल्ला आणि उपचार आवश्यक असतात. कुटुंबातील व्यक्तींनी अशा रुग्णांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. कोव्हिडनंतर पुरेशी विश्रांती घ्यावी. आधीपासून श्‍वसनविकार, हृदयविकार, मूत्रपिंड विकार आणि मेंदूविकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कोव्हिडच्या तिसर्‍या लाटेत रुग्णांना फारसा शारीरिक त्रास न झाल्यामुळे अनेकांनी नंतर विश्रांती घेणे टाळले आहे, ते अंगाशी येऊ शकते. कामाची दगदग कमी करावी. शारीरिक श्रम टाळावेत. बैठे आणि कमी तणावाचे काम करायला हरकत नाही. नियमितपणे प्राणायाम करावा. कोमट पाणी जास्त प्रमाणात प्यावे. अर्थात, ज्यांना मूत्रपिंडाचा विकार असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताजा आणि सकस आहार घ्यावा. आहारात पालेभाज्या, फळभाज्या भरपूर प्रमाणात घ्याव्यात. प्रथिनांसाठी मोड आलेली धान्ये वापरावीत. पुरेशी आणि शांत झोप घ्यावी. कुटुंबात खेळीमेळीचे आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. वाचन, संगीत यांत मन रमवावे. शारीरिक स्थिती उत्तम असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम सुरू करावा. कोरोनाची तिसरी लाट संपली आहे. आता चौथी लाट येणार किंवा नाही, त्याचा विपरीत विचार न करता, कुठल्याही विवंचनेत न राहता, आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेत आनंदात राहावे हेच बरे !

डॉ. अनिल मडके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news