नवी दिल्ली/खार्कोव्ह : वृत्तसंस्था : युक्रेनमधील 17 हजार भारतीय युक्रेन सीमेबाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत. आता जवळपास 3 हजार भारतीय युक्रेनमध्ये उरले आहेत. आजवर 3,352 भारतात दाखल झाले आहेत. पुढील 24 तासांत 15 विमाने वेगवेगळ्या देशांतून उर्वरितांना एअरलिफ्ट करतील. टप्प्याटप्प्याने सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यात येईल.
तिकडे युक्रेनमध्ये बुधवारी सायंकाळी 6 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता) खार्कोव्हमधील भारतीयांसाठी दूतावासाने दुसरी अॅडव्हायझरी जारी केली. खार्कोव्हहून पोसेचीन, बाबई किंवा बेजुल्योदोव्काला पोहोचावे, असे निर्देशही यातून देण्यात आले.
खार्कोव्हवरून पोसेचीन 11 कि.मी., बाबई 12 कि.मी., तर बेजुल्योदोव्का 16 कि.मी.वर आहे. खार्कोव्ह रेल्वेस्थानकावर शेकडो भारतीय अडकून पडले आहेत. येथे रेल्वे येईनाशा झाल्या आहेत.
हवाई दलाचे सी-17 ग्लोबमास्टर हे विमान 200 भारतीयांसह रात्री उशिरा रोमानियाहून दिल्लीला परतले. गुरुवारपर्यंत 4 ग्लोेबमास्टर विमाने 800 भारतीय विद्यार्थ्यांसह देशात परततील. पोलंड आणि हंगेरीहून गुरुवारी पहाटे दोन विमाने परततील. 10 विमानांतून 2,305 भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
हंगेरीतील बुडापेस्टहून स्पाईसजेटचे विमान आले. युक्रेनलगतच्या 7 देशांतून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमाने आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तिकडे बुखारेस्ट विमानतळावर रवाना होण्याची वाट बघत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चर्चा केली. शिंदे यांनी रोमानिया माल्दोवाच्या राजदूतांची भेटही घेतली. या भेटीनंतर माल्दोवाच्या सीमा भारतीयांसाठी तातडीने उघडण्यात आल्या.
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या विशेष आपत्कालीन आमसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी रशियाविरोधात 141 देशांनी मतदान केले. तर 5 देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केले.
भारतासह 35 देशांनी मतदानात सहभाग घेतला नाही. रशियाने युक्रेनमधील आपली लष्करी मोहीम थांबवावी आणि सर्व सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हे 1997 नंतरचे पहिले आपत्कालीन सत्र होते. आपत्कालीन सत्रात युक्रेनविरुद्ध रशियाच्या आक्रमकतेचा कठोर शब्दांत निषेध करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतीन यांच्याशी बुधवारी दुसर्यांदा चर्चा झाली. यादरम्यान भारतीयांच्या युक्रेनमधून सुरक्षितपणे निघण्याच्या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
रशियाचे अनेक सैनिक आमच्या ताब्यात आहेत. या सैनिकांना जन्माला घालणार्या मातांनी यावे आणि घेऊन जावे, असे युक्रेन संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. या सैनिकांची संख्या 60 असल्याचे यापूर्वी मंत्रालयाने सांगितले होते.