अनिल परब : सोमय्या स्वतः पडले, त्यांच्यावर हल्ला नाही | पुढारी

अनिल परब : सोमय्या स्वतः पडले, त्यांच्यावर हल्ला नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासदार संजय राऊत यांच्या भागीदारा विरोधात तक्रार देण्यासाठी पुणे महापालिकेत गेलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला, असे वाटत नाही. ते स्वत: पडल्याचा दावा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला आहे. नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांनी हॉटेल ताज येथे पत्रकारांशी संवाद साधला.

परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. सोमय्या यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. तसेच  भ्रष्टाचाराविरोधात लढताना त्यांनी केवळ शिवसेनेला लक्ष्य न करता सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले पाहिजे. सोमय्या यांच्यावरील हल्ल्याशी शिवसेनेशी काहीही संबंध नसून हल्ला झाल्यानंतर मला समजले, असा दावा त्यांनी केला. परब म्हणाले, माझ्या माहितीनुसार सोमय्या यांनी प्रत्यक्षात मारहाण झालेली नाही. निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांमुळे झालेल्या गर्दीत ते स्वत: पायरीवर पडले आहेत. त्यामुळे सोमय्यांनी उगीच राजकीय नौटंकी करू नये, असेही परब म्हणाले.

लतादीदींचा आवाज दैवी चमत्कार
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना अनिल परब म्हणाले, आपल्या देशाचे भाग्य आहे की असा स्वर आपल्या देशात जन्माला आला. आज तो स्वर हरपला असला तरी स्वराच्या माध्यमातून शतकानुशतके आपल्यासोबत राहणार आहेत. त्यांचा आवाज म्हणजे दैवी चमत्कार होता, असेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात लतादीदी यांनी भेटण्याचा योग आल्याची आठवण त्यांनी सांगितली.

हेही वाचा :

Back to top button