त्यांच्या कचखाऊ वृत्तीमुळेच कंपन्या रातोरात गायब : खा. उदयनराजे | पुढारी

त्यांच्या कचखाऊ वृत्तीमुळेच कंपन्या रातोरात गायब : खा. उदयनराजे

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारची एमआयडीसी स्थापन झाली त्यावेळी आम्ही तिसरीमध्ये होतो आणि त्यांचा तर जन्म नव्हता. तत्कालीन लोकप्रतिनिधी, त्यानंतरचे लोकप्रतिनिधी व ज्यांचा बालकमंत्री म्हणून उल्लेख केला गेला होता या सर्वांच्या कचखाऊ वृत्तीमुळे बांधकामास सुरुवात करणारी डॉ. बेग, इंडीयन सिमलेस पाईप्स, एल अ‍ॅन्ड टी यासारख्या अनेक कंपन्या रातोरात दुसरीकडे गेल्या, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यावर नाव न घेता केली.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, साताराबरोबरच सुरु झालेली नगरची एमआयडीसी आज मात्र कुठच्या कुठे गेली आहे. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेवून वक्तव्य करावे. साप समजुन भुई थोपटण्याची सवय सोडावी. पडद्याआडून गुन्हे करणार्‍या (व्हाईट कॉलर) क्रिमिनल्सनी दुसर्‍यांवर आरोप करणे त्यांना शोभून दिसते. त्यांनी केलेल्या आरोपांना आपण आणि सामान्य जनता काडीचीही किंमत देत नाही. विविध कारणांमुळे एमआयडीसीची खरी वाट लागली हे त्यांनासुध्दा माहिती आहे. परंतु, त्यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र उदयनराजेच दिसतात म्हणून आमच्या नावाने नेहमीप्रमाणे गरळ ओकतात.

वय वाढलं की बाल बुध्दी येते मग राजकारणातील त्यांच्यापेक्षा सर्व ज्येष्ठ व्यक्तींचीही बालबुध्दी आहे, असेच त्यांना म्हणायचे आहे का? असे असेल तर मात्र नक्कीच मोठा मानसिक धक्का त्यांना बसला असावा आणि आता उपचाराची तातडीने गरज आहे. त्यांच्या बालबुध्दी वक्तृत्वाची त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या राजकारणी व्यक्ती नक्कीच नोंद घेतील. ते सर्व मिळून त्यांना आणखी पक्षविरहीत धक्के देतील याची काळजी वाटते, असेही खा. उदयनराजे यांनी आ. शिवेंद्रराजे यांचा नामोल्लेख टाळून म्हटले आहे.

आम्ही त्यांच्यासारखे थंड रक्ताचे नाही…

सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्यासारखे थंड रक्ताचे नाही. अन्यायाला विरोध करणारच. पंडीत ऑटोमोटिव्हच्या जागेसह सर्वच व्यवहार झालेल्या जागांची न्यायालयीन चौकशी लावणारच आहे. त्यात सर्व काही बाहेर येईल, असा खरमरीत टोलाही खा. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता लगावला.

Back to top button