नाशिकमध्ये ८ जुलैला ‘शासन आपल्या दारी’, काय आहे उपक्रम? | पुढारी

नाशिकमध्ये ८ जुलैला 'शासन आपल्या दारी', काय आहे उपक्रम?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ जुलै रोजी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यभरात एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिकमध्ये येत्या ८ जुलै रोजी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

उपक्रमासाठी जिल्हाभरातून किमान ५० हजार नागरिक हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपाेवनातील मोदी मैदानावर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमात लाभार्थींना योजनांचे प्रमाणपत्र वितरणासह तेथे शासकीय विभागांचे माहितीपर विविध २५ स्टॉल्स‌ उभारण्यात येणार आहेत. रोजगार मेळावाही घेण्यात येणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी वॉटरप्रूफ मंडप उभारणे, आसनव्यवस्था, वाहनतळ, सामान्यांसाठीच्या आरोग्य सुविधा आदी आघाड्यांवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’द्वारे जिल्ह्यात आजपर्यंत ७० शिबिरांमधून दोन लाख ४४ हजार ४३ लाभार्थींना विविध सेवांचे वितरण करण्यात आले.

ना. भुसे घेणार आढावा

राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील कार्यक्रमांच्या स्वरूपापेक्षा नाशिकचा कार्यक्रम आगळावेगळा ठरावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे हे शुक्रवारी (दि.३०) बैठक घेत तयारीचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.२७) दुपारी तपोवनातील मोदी मैदान परिसराची पाहणी केली.

हेही वाचा : 

Back to top button