पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर पाठलाग करून तरुणीवर कोयत्याने वार करण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा हल्लेखोर प्रवृत्तींना वेळीच ठेचण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. दर्शना पवार या तरुणीचा तिच्या मित्राने निर्घृण केलेल्या खुनाची घटना ताजी असतानाच मंगळवारी सदाशिव पेठेत सकाळी तरुणाने प्रेमप्रकरणातून तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तरुणीचे प्राण वाचले. पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर असतानाही ही घटना घडली आहे.
गृह विभागाने एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना कार्यवाहीपर सूचना केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी अशा स्वरूपाच्या गंभीर घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारची घटना घडली की पोलिस तेवढ्यापुरते गांभीर्याने घेतात. काही काळ लोटला की, रस्त्यावर महिला पथके दिसत नाहीत, असेही नागरिक बोलून दाखवतात.
या घटनाही शहारे आणणाऱ्या…..
रिक्षाचालकाकडून अत्याचाराचा प्रयत्न
कामावरून घरी जात असताना पहाटेच्या सुमारास
रिक्षा आडबाजूला थांबवून आयटी अभियंता महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न रिक्षाचालकाने केल्याची घटना नुकतीच शहरात घडली. प्रसंगावधान राखत तरुणीने रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. या रिक्षाचालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली.
बिबवेवाडीतील घटनेने अंगावर शहारे
12 ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील यशलॉन्स येथे सराव करत असताना कबड्डीपटू असलेल्या चौदा वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाने कोयत्याने वार करून खून केला. हा खून देखील एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाला होता. पुणेकरांच्या अंगावर शहारे निर्माण करणारी ही घटना घडली होती. खून झालेली 14 वर्षीय मुलगी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मैत्रिणींसोबत बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या आरोपी व त्याच्या साथीदारांनी बाजूला घेऊन कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला होता.
हे ही वाचा :