सांगली : वीज बिल घोटाळा ‘एसआयटी’ नेमण्याची कार्यवाही सुरू | पुढारी

सांगली : वीज बिल घोटाळा ‘एसआयटी’ नेमण्याची कार्यवाही सुरू

सांगली, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडील पथदिवे वीज बिल घोटाळा चौकशीसाठी एसआयटी नियुक्तीची कार्यवाही सुरू झाली आहे. उपायुक्त राहुल रोकडे हे मंगळवारी पोलिस महासंचालक कार्यालयात गेले होते. ‘एसआयटी’मधील सदस्यांची नियुक्ती झाली नसल्याकडे रोकडे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एसआयटी नेमण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

एप्रिलमध्ये मुंबईत लोकायुक्त माजी न्यायमूर्ती कानडे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. पथदिवे वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी नियुक्तीचे आदेश लोकायुक्तांनी पोलिस महासंचालकांना दिले होते. घोटाळ्याबाबत लोकायुक्तांनी गांभीर्याने टिपणी केली होती. हा आर्थिक गुन्हा मोठा आहे. सखोल तपास गरजेचा आहे. चौकशीसाठी तीन सदस्सीय एसआयटी नेमा.

या समितीत एक वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिकेचा एक अधिकारी आणि चार्टर्ड अकौंटंट यांची नियुक्ती करा, असा आदेश लोकायुक्तांनी पोलिस संचालकांना काढला होता. आठ आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ही मुदत संपत आली तरी एसआयटी सदस्य नियुक्त झाले नसल्याकडे तक्रारदार वि. द. बर्वे यांनी लक्ष वेधले होते. 3 जुलै रोजी लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. त्यावेळी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे हे मंगळवारी मुंबईत पोलिस महासंचालक कार्यालयात गेले. एसआयटी चौकशीसाठी सदस्य नियुक्त झाले नसल्याकडे लक्ष वेधले. एसआयटी सदस्यांची नेमणूक करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. चौकशी करून लोकायुक्तांना अहवाल सादर होणार आहे.

Back to top button