नाशिक : अखेर पावसाला मुहूर्त! निफाडमध्ये पावसाला सुरुवात | पुढारी

नाशिक : अखेर पावसाला मुहूर्त! निफाडमध्ये पावसाला सुरुवात

निफाड; पुढारी वृत्तसेवा : सात जूनला सुरू होणाऱ्या मृग नक्षत्रातील तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी निफाड परिसरात पर्जन्य राजाने चांगलीच अवकृपा केले होती. मृग नक्षत्र कोरडेच जाते की काय अशी भीती वाटत असताना शनिवारी (दि.२४) रोजी सायंकाळी मोसमी हंगामात पहिल्यांदाच निफाड परिसरात पावसाला मुहूर्त मिळाला आहे.

सायंकाळी पाच वाजेपासून हलक्या रिमझिम स्वरूपात सुरू असणाऱ्या पावसाने दोन तासानंतर चांगलाच वेग धरल्याचे दिसून आले. तत्पूर्वी, दिवसभर उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झालेले होते. सायंकाळच्या या पावसामुळे तापमानात मोठी घट होऊन वातावरणात चांगलाच गारवा पसरल्याचे बघायला मिळाले. वीज वितरण कंपनीने मात्र, पहिल्या पावसाचे आपल्या नेहमीच्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित करून जोरदार स्वागत केले.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तब्बल महिनाभरापासून जमीन नांगरून वखरून, फळी मारून तयार करून ठेवलेल्या आहेत. अजून पर्यंत थेंबभर ही पाऊस झालेला नसल्यामुळे पेरणी कधी करायची या संकटात शेतकरी वर्ग सापडलेला होता. हवामान खात्याने पुढील पाच दिवस पाऊस पडणार असल्याचे अंदाज वर्तवलेले असल्याने साधारणपणे पुढील आठवड्यात सोयाबीन मका आदि खरीप पिकांच्या पेरणीला वेग येईल असे चित्र दिसू लागले आहे.

निफाडच्या परिसरात टोमॅटोचे देखील चांगले उत्पादन होते. मात्र, पाऊस नसल्यामुळे टोमॅटोच्या लागवडी खोळंबलेल्या होत्या. पुढील आठवड्यात त्यांना देखील चांगलाच वेग मिळेल असा अंदाज आहे.

हेही वाचा;

Back to top button