पुढारी ऑनलाइन डेस्क : Russia- Putin Vs Wagner Group : रशियात वॅगनर या प्रायव्हेट मिलिटरीने बंड करून वॅगनर समूहाचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात नारा दिला आहे. तसेच रशियातील सैन्य मुख्यालयावर ताबा घेतला आहे. त्यानंतर पुतिन यांनी मॉस्कोत आता हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच रशियन जनतेच्या नावाने पुतिन यांनी संदेश जारी करून पाठीत खंजर खुपसणाऱ्या या देशद्रोही समूहाला कडक शिक्षा देऊन त्यांचे बंड चिरडून टाकणार असल्याचा संदेश दिला आहे.
वॅगनर ही रशियाची एक खासगी निमलष्करी संघटना आहे. ही संघटना भाडेतत्वावर रशियासाठी कायम कार्य करते. प्रसंगी रशियासाठी हे सैन्य प्राणही द्यायला तत्पर असते. रशिया-युक्रेन युद्धात वॅगनर समूहाने प्रत्यक्ष सहभाग घेतला. मात्र, रशियन सैन्य आणि वॅगनर समूह यांच्यात वादाची ठिणगी पडली. पाहता-पाहता याचे रुपांतर बंडात झाले. त्यानंतर वॅगनर समूहाचा प्रमुख प्रिगेझिन याने पुतिन विरोधात नारा दिला.
वॅगनरने युक्रेन सीमेजवळील रशियाच्या एका शहराचा ताबा घेतल्याचा दावा केला आहे. आणि आपले सैन्य आता लवकरच मॉस्को कडे रवाना झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुतिन विरोधात सोशल मीडियावर काही वीडिओ संदेश शेअर केले आहेत. तसेच पुतिन यांना पदावरून हटवण्याचा नारा दिला आहे. एवढेच नाही तर येवगेनीने आपले सैनिक रशियन संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय रोस्तोव-ऑन-डॉन ताब्यात घेण्यासाठी पाठवले आहेत.
अशा परिस्थितीत मॉस्कोमध्ये रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. मॉस्कोच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टाक्या आणि चिलखती वाहने दिसली आहेत. क्रेमलिनच्या आसपास लष्करी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. Russia- Putin Vs Wagner Group
मिळालेल्या माहितीच्या आधारे मॉस्कोच्या महापौरांनी दहशतवादविरोधी कारवाया सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सोशल मीडियावर सांगितले की, "मॉस्कोमध्ये येत असलेल्या माहितीच्या संदर्भात, सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने दहशतवादविरोधी उपाययोजना केल्या जात आहेत."
वॅगनरच्या बंडानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्राला संबोधित केले. देशातील एका मोठ्या शहरात प्रवेश केला. यादरम्यान पुतिन यांनी एका खासगी लष्कराच्या प्रमुखाने केलेल्या सशस्त्र बंडाच्या घोषणेला 'देशद्रोह' म्हणून संबोधले आणि 'लोक आणि रशियाचे संरक्षण' करण्याचे आश्वासन दिले. पुतीन म्हणाले की रशिया "त्याच्या भविष्यासाठी" सर्वात कठीण लढाई लढत आहे.
देशाला संबोधित करताना पुतिन म्हणाले की हा एक "विश्वासघात" आहे. पुतिन म्हणाले, "भाऊ भावाविरोधात उभे केले जात आहे. वॅगनरने रशियाच्या लोकांचा विश्वासघात केला आहे. त्याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. वॅगनरने रशियन सैन्याला आव्हान दिले आहे. त्यासाठी लष्कराला सतर्क करण्यात आले आहे, बंड करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा केली जाईल.
प्रीगोझिनच्या बंडानंतर, रशियन संरक्षण मंत्रालयाने देखील त्वरित प्रतिक्रिया दिली आहे आणि प्रीगोझिनच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. प्रिगोझिनला सशस्त्र बंडखोरीसाठी 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) च्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी समितीने वॅगनर गटाच्या प्रमुखावर सशस्त्र बंडखोरीचा आरोप केला आहे. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने वॅगनरच्या सैन्याला प्रीगोझिनच्या आदेशांचे पालन करण्यास नकार देण्याचे आवाहन केले. एफएसबीने प्रीगोझिनच्या बंडाचे वर्णन रशियन सैन्याच्या पाठीत वार केले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत.
हे ही वाचा :