नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असताना ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एक लाखांच्या आसपास लोकसंख्येला ५३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या दररोज सव्वाशेहून अधिक फेऱ्या होत आहेत.

संपूर्ण मे महिन्यात जिल्ह्यावर सूर्य कोपला असून, वाढत्या उष्णतेसोबतच ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाण्याचे तीव्र दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. येवला, मालेगाव, बागलाण, चांदवड, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांना टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. परिणामी, जनतेला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे.

येवला तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे. तालुक्यातील २८ गावे व १५ वाड्या अशा एकूण ४३ ठिकाणी २० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातोय. मालेगावी नऊ टँकरच्या माध्यमातून १५ ठिकाणी पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय पेठ व इगतपुरीत प्रत्येक पाच टँकर धावताहेत. तसेच सुरगाणा, बागलाण व चांदवडला प्रत्येकी ४; सिन्नर व देवळ्यात प्रत्येकी एक टँकरद्वारे सुरू आहे. दरम्यान, ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी टँकरसोबतच प्रशासनाने तब्बल ४१ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यातील २७ गावांसाठी, तर उर्वरित टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालेगावला ११, पेठला ९, नांदगावला ५, बागलाण, सुरगाणा व दिंडोरीत प्रत्येकी ४, देवळ्यात ३ व येवल्यात १ विहिरीचा यात समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button