शिंदे गटातील ‘हे’ आमदार म्हणतात मला मातोश्रीवर घेऊन चला; जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट | पुढारी

शिंदे गटातील 'हे' आमदार म्हणतात मला मातोश्रीवर घेऊन चला; जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा : मला काही करून मातोश्रीवर घेऊन जा, असे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर सगळ्यांना सांगत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की नाहीतर पुन्हा निवडून येणार नाही, ते कोणाला संदेश देत आहेत तेही मला माहीत आहे, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे पाय बालाजी किणीकर यांनी पकडले तरी त्यांना उद्धव ठाकरे हे अंबरनाथ विधानसभेचे पुन्हा तिकीट देणार नाहीत, हे मला माहीत आहे, असे ही आव्हाड म्हणाले.

उल्हासनगर कॅम्प ५ येथील प्रभात गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हा इशारा दिला. केवळ शिंदे गटाचे नव्हे तर भाजपचे पण विद्यमान आमदार, खासदार आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत होणार असल्याचे विविध सर्व्हेनुसार स्पष्ट झाले आहे. एवढेच काय तर भाजपच्या सर्व्हेमध्ये देखील हेच म्हटले आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेवर भाजप व शिंदे गटाचा डोळा आहे त्यात देखील त्यांचा दारुण पराभव होणार आहे, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना भरभरून मतदान होणार हे माहीत असल्याने भाजप निवडणूक लावत नसल्याचे ही त्यांनी सांगितले. मी आताच स्पष्टपणे सांगतो की, डॉ बालाजी किणीकर हे आगामी निवडणुकीत ४० हजार पेक्षा जास्त मतांनी पराभूत होणार आहेत. या मंचाच्या माध्यमातून सांगत आहे की केवळ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिंदे गटाला पराभूत करण्याची आपली जबाबदारी नसून अंबरनाथ, कल्याण विधानसभा निवडणुकीत जे-जे शिंदे गट व भाजपचे उमेदवार उभे राहतील त्यांना पराभूत करा. निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे, अंबरनाथ विधानसभेच्या ११० बुथची जबाबदारी कलानी परिवारावर आहे. तयारीला लागा नुसती बडबड आम्हाला नको. आता कोणत्याही चुकीला आम्ही माफी देणार नाही, असे जिल्हाध्यक्ष पंचम कलानी याना खडसावून सांगितले.

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे दबावतंत्राचा वापर करीत असून तत्कालीन अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, बदलापूर शिवसेनाप्रमुख वामन म्हात्रे यांना धमकावून, गुन्हे दाखल करून त्यांना मानसीक त्रास देऊन पक्ष प्रवेश करविला गेला आहे. मला निनावी फोन द्वारे देखील धमक्या येत आहेत, पण मी धमक्यांना घाबरणारा नाही, भविष्यात जेव्हा केव्हा ५० खोके बाबत चर्चा होईल तेव्हा माझी मुले अभिमानाने सांगतील की खोक्यांच्या काळात मी स्वाभिमानाने वागलो, कोणत्याही आमिष किंवा धमक्यांना घाबरलो नाही. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर पंचम कलानी, सीमा कलानी, कुमारी ठाकूर, कमलेश निकम, मनोज लासी, शिवाजी रगडे, जमील खान, संतोष पांडे, प्रभूनाथ गुप्ता, मोनू सिद्दीकी, सुंदर मुदलीयार आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button