अहमदनगर : पीक कर्ज व्याज सवलतीचे 100 कोटी थकले | पुढारी

अहमदनगर : पीक कर्ज व्याज सवलतीचे 100 कोटी थकले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य शासनाचे तीन टक्के व्याज सवलत योजनेची रक्कम आल्यानंतर ती जिल्हा बँकेतून तत्काळ संबंधित शेतकर्‍यांचे बँक खाते जमा केली जाते. मात्र केंद्र शासन व्याज सवलतीचे 2021-22 मधील 32 कोटी नाबार्डकडे; तर डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील 2020-21 मधील 29.30 कोटी तसेच 2021-22 मधील 56.09 कोटी शासनस्तरावरच प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खाती जमा केली जाणार आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी जिल्ह्यातील प्राथमिक वि. का. सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणात अल्पमुदत पिक कर्ज पुरवठा व पशुपालन खेळते भांडवल कर्ज पुरवठा करत आहे. सदर शेतकरी सभासदांनी रक्कम तीन लाखपर्यंत अल्पमुदत कर्जाची नियमित परतफेड केल्यास केंद्र शासन तीन टक्के व राज्य शासनाचे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत तीन टक्के याप्रमाणे सहा टक्के व्याज सवलत मिळत आहे.

व्याज सवलत रक्कम शासनाकडून प्राप्त झालेनंतर त्वरित पात्र कर्जदार शेतकर्‍याचे बँक खाते जमा केले जाते. या पूर्वीच्या काळात शासनाकडुन व्याज सवलत रक्कम बँककडे जमा होत होती. त्यावेळी बँक ती रक्कम संबंधीत सोसायटीच्या चालू खाती वर्ग केली जात होती. अशा वेळी शेतकर्‍यांकडून व्याज वसूल केले जात नव्हते.

तथापी सन 2019-20 पासून व्याज सवलत रक्कम शेतकरी सभासदांचे बचत खाती जमा करावे, अशा सूचना सहकार खात्याने दिल्या असल्यामुळे शेतकरी सभासदांकडून अल्पमुदत कर्जाची रक्कम वसूल करताना व्याज वसूल करून घेतले जाते. व्याज सवलत रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर त्वरित शेतकर्‍याचे बँक खाती जमा दिले जाते. यामध्ये काही वेळा शासनाकडून उशिरा रक्कम प्राप्त होते त्यामुळे शेतकर्‍यांना रक्कम उशिराने मिळते.

केंद्र शासन व्याज सवलत योजना

सदर योजनेअंतर्गत नाबार्डकडून सन 2020-21 सालाची 3 टक्के व्याज सवलत जिल्ह्यातील 2,27,902 शेतकर्‍यांना 33.56 कोटी दि.22 जुलै 2022 रोजी बँकेस प्राप्त झालेली आहे. सदर रक्कम त्याच दिवशी तालुका शाखांना तालुक्यातील कर्जदार शेतकरी सभासदांचे बँक खाती जमा होण्यासाठी वर्ग केलेले आहेत. तसेच सन 2021-22 सालाचे तीन टक्के व्याज सवलत प्रस्ताव दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील 2,79,130 शेतकर्‍यांची 32.81 कोटी नाबार्डकडे प्रस्ताव सादर केलेला असून अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (राज्य शासन)

सदर योजनेअंतर्गत सन 2019-20 पर्यतचे व्याज सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रस्ताव मंजूर असून, व्याज सवलतीची रक्कम शासनाकडून कर्जदार शेतकरी सभासदांचे बँक खाती जमा केलेली आहे. तसेच सन 2020-21 सालाचे 2,07,650 कर्जदार शेतकरी सभासदांचे 29.30 कोटी शासनाकडे प्रलंबित आहेत. तसेच सन 2021-22 मधील 2,53,782 कर्जदार शेतकरी सभासदांचे व्याज सवलत 56.09 कोटी शासन स्तरावर हेही प्रलंबित आहेत. बँकेकडे शासनाकडून प्राप्त झालेल्या व्याज सवलत व इतर अनुदान रकमा वेळेत संबंधित पात्र कर्जदार शेतकर्‍यांचे बँक खाती जमा केले जातात, अशी कोणतीही रक्कम बँकेकडे प्रलंबित नाही अशीही माहिती बँकेचे कर्डिले यांनी दिली.

सभासदांची दिशाभूल करू नये ः कर्डिले

व्याज सवलत रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर त्वरित शेतकर्‍यांचे बँक खाती जमा केली जाते. यामध्ये काही वेळा शासनाकडून उशिरा रक्कम प्राप्त होते त्यामुळे शेतकर्‍यांना रक्कम उशिराने मिळते. बँक शेतकरी सभासदांची शासनाकडून प्राप्त झालेली व्याज सवलत रक्कम वापरत नाही. याबाबत शेतकरी सभासदांची कोणीही दिशाभूल करू नये,अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली

Back to top button