कटकारस्थान करुन सरकार पाडले तेव्हा तुमचे प्रेम कुठे गेले होते..?, पंतप्रधान मोदींना उध्दव ठाकरेंचा सवाल | पुढारी

कटकारस्थान करुन सरकार पाडले तेव्हा तुमचे प्रेम कुठे गेले होते..?, पंतप्रधान मोदींना उध्दव ठाकरेंचा सवाल

धाराशिव; पुढारी वृत्तसेवा : मी आजारी असताना तुमचे बगलबच्चे करकारस्थान करुन माझे सरकार पाडत असताना तुमचे उध्दव ठाकरेवरील प्रेम कुठे गेले होते, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तुम्ही महाराष्ट्रावरील संकट आहात. अगोदर स्वत:ला आवरा, महाराष्ट्राच्या विकासाचे पाहण्यास आम्ही समर्थ आहोत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारसभेत शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपवर जोरदार टिका केली. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर शनिवारी (दि. चार) रात्री आठ वाजता ही सभा झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलींद नार्वेकर, आ. कैलास पाटील, संपर्कप्रमुख शंकर बोरकर, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते. जाहीर सभेला शिवसैनिकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ठाकरे म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी एका वाहिनीला मुलाखत देताना उध्दव ठाकरे संकटात असतील तर बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी मदतीसाठी सर्वात पुढे असेन, असे वक्‍तव्य केले होते. मोदींचे माझ्यावर इतकेच प्रेम आहे तर त्यांचे बगलबच्चे आमच्या काही गद्दारांना हाताशी धरुन माझे सरकार पाडत होते. तेव्हा मी शस्त्रक्रिया झाल्याने दवाखान्यात होतो. हे माहिती असूनही मग मोदी गप्प का होते. 2014 मध्ये शिवसेनेशी भाजपने युती तोडली, 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षे वाटपावरुन भाजपने शब्द फिरविला तेव्हा हे प्रेम कुठे होते?

महाराष्ट्रावर ज्या ज्या लोकांनी चाल करण्याचा प्रयत्न केला त्यांना मातीमोल करण्याचे काम येथील मराठी मातीने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या वेळी मोदीं, शहांना गोबॅक म्हणत नक्‍की गुजरातला पाठवून देईल. मुंबईचा हिरे बाजार, महाराष्ट्रातील मोठे उद्योग, मुंबईचे आर्थिक केंद्र गुजरातला हलविण्याचा निर्णय भाजपने केला. त्याची किंमत मेाजावी लागेल. केंद्रात आगामी सरकारे इंडिया आघाडीचे असेल. त्या वेळी आम्हीही भाजपचे घरगडी म्हणून काम करीत असलेल्या ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स तसेच निवडणूक आयोगाला बघून घेऊ, असा इशाराही श्री. ठाकरे यांनी दिला. आपले सरकार आल्यानंतर शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य, खते, बियाणे, औजारे जीएसटीमुक्‍त करु, व्यापार्‍यांना सतावत असलेला कर दहशतवाद संपवू, असे आश्‍वासन दिले. शिवसेना व जनतेशी इमान राखणार्‍या ओमराजेंना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.

ठाकरे म्हणाले….

  • आमचे हिंदूत्व देवळात घंटा बडवणारे नसून देशद्रोह्यांना बडवणारे
  • आमचे हिंदुत्व घरे पेटवणारे नव्हे तर घरातील चूल पेटवणारे
  • शिवसेना गीतातून जयभवानी, जय शिवाजी शब्द काढणार नाही
  • बुरसटलेले हिंदुत्व नको आम्हाला प्रबोधनकारांचे हिंदुत्व हवे

अमित शहांना आव्हान

ठाकरे म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी अमित शहांनी मला सावरकरांवर बोलण्याचे आव्हान दिले होते. मी बोलेन. पण अगोदर अमित शहांनी जनतेच्या प्रश्‍नांवर बोलावे. मराठवाड्याला दहा वर्षात या सरकारने पाणी का दिले नाही या विषयावर बोलावे.

Back to top button