Nashik : रिक्षासह शस्त्र हस्तगत; गोळीबारप्रकरणी आणखी दोन संशयित ताब्यात | पुढारी

Nashik : रिक्षासह शस्त्र हस्तगत; गोळीबारप्रकरणी आणखी दोन संशयित ताब्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

परिसरातील बाजीप्रभू चौकात रविवारी सकाळच्या सुमारास गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळ्या झाडल्याप्रकरणी आणखी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हेगारांकडून पोलिसांनी धारदार शस्त्र, हॉकी स्टिक तसेच गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली रिक्षा हस्तगत केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या जया दिवे व विकी ठाकूर या संशयितांना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

या गोळीबार प्रकरणात अनेक गुन्हेगारांचा समावेश असून, पोलीस त्या दृष्टीने गुन्हेगारांच्या शोधात आहे. या गुन्ह्यात एकूण ११ गुन्हेगार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी रविवारी संशयित जया दिवे व विकी ठाकूर यांना अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करून गुन्ह्यात सहभागी असलेली रिक्षा हस्तगत केली आहे. तसेच पोलिसांनी एका ठिकाणाहून कोयते, हॉकी स्टिक्स ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी किरण क्षीरसागर, गौरव गांगुर्डे यांनाही ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गोळीबार करणारा सागर पवार हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर करत आहेत. दरम्यान, जखमी राकेश कोष्टीवर उत्तमनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणी सोमवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

हेही वाचा : 

Back to top button