जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे | पुढारी

जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही. अजित पवार सोडले, तर आमदारांनी विश्वास ठेवावा, असा कोणताच नेता सक्षम नाही. पण संभाव्य वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. शिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होते, असेही म्हणता येणार नाही. कारण पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतात. अशातही दादा जिथे जातील तिथे आम्ही जाऊ, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मांडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून केव्हाही घोषित केला जाणार असल्याने, राज्यातील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याने, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीतही वर्तविले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार कोकाटे यांनी अजित पवार यांच्या बाजूने उडी घेतल्याने, चर्चेला एकप्रकारे बळच मिळाले आहे. नाशिकमधील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना कोकाटे म्हणाले की, राज्यात सर्वात सक्षम नेता म्हणून अजित पवार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणताही पक्ष विचार करेल, यात शंका नाही. मात्र, उगाच मी अंदाज व्यक्त करत नाही. अंदाजावर भाकीतही करत नाही. जशी परिस्थिती निर्माण होईल तसे निर्णय घेण्यात येतील. जो निर्णय होईल, त्याला आम्ही बांधील आहोत. सरकार पडणार नाही, हे सत्यच आहे. १६ आमदार अपात्र ठरल्याने सरकार पडणार नाही, असेही कोकाटे यांनी म्हटले.

ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली आवक आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहेच, त्यांच्या पक्षाची शहरी भागात चांगली पकड आहे. पण शिंदे सेनेमुळे शहरात त्यांचे विभाजन झाले आहे. तसे राष्ट्रवादीबाबत कुठेही नाही म्हणून भाजपकडून पर्याय तपासले जात असतील, असेही कोकाटे यांनी म्हटले.

भाजपकडे सर्व यंत्रणा

महाराष्ट्रातून भाजपला १० ते १५ पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा मिळू शकणार नाहीत. मोठ्या प्रमाणात जागा या विरोधकांना मिळणार आहेत, हे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळेच भाजप वेगळा विचार करू शकतो, चाचपणी करू शकतो, वेगळे पर्याय पडताळू शकतो. हे सर्व साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहेतच, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा : 

Back to top button