Nashik : ६९ शाळा होणार स्मार्ट, स्मार्ट सिटीकडून अखेर वर्कऑर्डर | पुढारी

Nashik : ६९ शाळा होणार स्मार्ट, स्मार्ट सिटीकडून अखेर वर्कऑर्डर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेला स्मार्ट स्कूलचा प्रकल्प अखेर मार्गी लागला असून, स्मार्ट सिटी कंपनीने संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिला आहे. येत्या जून २०२३ पर्यंत ६९ स्मार्ट स्कूलचे कामकाज पूर्ण करावयाचे आहे. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून मनपातील तब्बल २९ हजार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून स्मार्ट शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारावी आणि सामान्य, गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळाव्या या दृष्टीने महापालिकेने स्मार्ट स्कूल प्रकल्प हाती घेतला. त्यास तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी चालना दिली. स्मार्ट सिटी कंपनीकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर करून त्यास निधी मंजूर करून घेतला आणि हे काम अंतिम टप्प्यात असतानाच शासनाकडून त्यांची बदली करण्यात आली. मनपा शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगड यांनी स्मार्ट स्कूलबाबतची निविदा प्रक्रिया राबवून अंतिम झालेल्या कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देण्याबाबतची प्रस्ताव सादर केला होता. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून हा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या हाती राखून ठेवला होता. जून २०२३ पर्यंत कंत्राटदारास काम पूर्ण करण्याची मुदत आहे. परंतु, चार महिने प्रस्ताव कंपनीकडेच पडून राहिल्याने नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना स्मार्ट स्कूलमधून अध्यापन मिळणार का, याविषयी शंका निर्माण होते.

६५६ स्मार्ट क्लासरूम

स्मार्ट स्कूल प्रकल्पाअंतर्गत मनपाच्या ८८ शाळांपैकी ७९ शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यासाठी ६९ कोटींचा निधी खर्च होणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून ६५६ क्लासरूम, ६९ प्रयोगशाळा व ६९ मुख्याध्यापक कक्ष तयार करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटी कंपनीने संबंधित कंत्राटदार कंपनीस वर्कऑर्डर अदा केली.

या बाबींचा असेल समावेश

स्मार्ट स्कूलमध्ये डिजिटल सामग्री, वायरलेस माइक आणि स्पीकर सिस्टीम, लॅन कनेक्टव्हिटी, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बेंच, शिक्षक टेबल, खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्युब, पंखे, पेंटिंग व किरकोळ दुरुस्ती तसेच २० डेस्कटॉप संगणक, एक हाय एंड संगणक (स्थानिक सर्व्हर), नेटवर्क रॅक, विंडोज ओएस, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट व अँटिव्हायरस सॉफ्टवेअर, एअर कंडिशनर, अग्निशमन यंत्रे, डेस्कटॉप संगणक, टॅब्लेट, प्रिंटर, सीसीटीव्ही, ३२ इंची एलईडी टीव्ही, संगणक टेबल व खुर्ची, क्लाऊड आधारित शाळा प्रशासन साॅफ्टवेअर, ब्रॉडबॅण्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध बाबींचा समावेश असेल.

हेही वाचा :

Back to top button