नाशिक : वैद्यकीय साहित्य चोरी प्रकरणी आरोग्य विभागाचे पथक उद्या सिन्नर दौर्‍यावर | पुढारी

नाशिक : वैद्यकीय साहित्य चोरी प्रकरणी आरोग्य विभागाचे पथक उद्या सिन्नर दौर्‍यावर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या स्टॉकरूममधून सुमारे 23 लाख 64 हजार 340 रुपयांचे वैद्यकीय साहित्य चोरीस गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी शनिवारी (दि. 28) ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. सोमवारी (दि. 30) जिल्हा आरोग्य विभागाचे पथक सिन्नरमध्ये धडकणार असून त्यानंतर या प्रकरणातील बरेच चित्र स्पष्ट होणार आहे.

सिन्नर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी कंत्राटी पद्धतीने काम करणारा एक्स-रे टेक्निशियन अनिल कासारला अटक केलेली आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे यांच्यासह वैद्यकीय साहित्याची तपासणी केली. उपलब्ध असलेल्या अथवा गहाळ साहित्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. हा अहवाल आल्यानंतरही वैद्यकीय साहित्याचा स्टॉक बरोबर आहे किंवा काय, याबाबत शहानिशा होणार असल्याचे डॉ. पवार म्हणाले. वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील राठोड, दीपक धुमाळ यांच्यासह पथक सोमवारी ग्रामीण रुग्णालयासह ज्या ज्या खासगी हॉस्पिटल्सला संशयिताने वैद्यकीय साहित्याची विक्री केली आहे, त्या खासगी हॉस्पिटल्सना भेटी देऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. तथापि, या प्रकरणात सोमवारनंतर कठोर निर्णय घेऊन बदल झालेले दिसतील, अशी ग्वाही डॉ. पवार यांनी दिली. कोरोनाकाळात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास विविध कंपन्या, सेवाभावी संस्था यांच्या वतीने वैद्यकीय साहित्याची मदत करण्यात आली होती. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या 146 वस्तू आहेत. त्यांची किंमत लाखो रुपये आहे. यावेळी डॉ. चेतन ठोंबरे, डॉ. प्रशांत खैरनार, सामाजिक कार्यकर्ते शुभम घुगे आदी उपस्थित होते.

एक फेब्रुवारीपासून दोन सुरक्षारक्षक तैनात
कोट्यवधींचे साहित्य ग्रामीण रुग्णालयाच्या एका स्टॉकरूममध्ये असताना एक साधा सुरक्षारक्षकही या नाही. ही आश्चर्याची बाब मानली जात आहे. हीच संधी साधून संशयितांनी लाखो रुपयांचे वैद्यकीय साहित्य हस्ते-परहस्ते गहाळ केल्याचे समोर आले. त्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली असून एक फेब्रुवारीपासून दोन सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी दिली. या प्रकरणात जे कर्मचारी सापडतील त्यांचे थेट निलंबन होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

‘त्या’ हॉस्पिटल्सचे धाबे दणाणले
पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेले असल्यामुळे त्याची रिकव्हरी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तथापि, या प्रकरणातील संशयित अनिल कासारने चोरीचे साहित्य शहरातील खासगी हॉस्पिटल्सना जुजबी किमतीत विक्री केल्याचा प्रकार उजेडात आला असून, जवळपास पाच खासगी हॉस्पिटल्सची नावे समोर येत आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ही नावे गुलदस्त्यात ठेवलेली आहेत.

हेही वाचा:

Back to top button