नगर : नगर – पुणे महामार्गावरील प्रवाशांची झाली दुर्गंधीपासून सुटका | पुढारी

नगर : नगर - पुणे महामार्गावरील प्रवाशांची झाली दुर्गंधीपासून सुटका

वाळकी : पुढारी वृत्तसेवा  : नगर – पुणे महामार्गावर कामरगाव, सुपा हद्दीत दोन्ही गावांच्या सीमेवर रस्त्याच्या दुतर्फा ओला व सुका कचर्‍याचे ढीग लागले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिसरात दूर्गंधी पसरली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक मन: स्ताप सहन करावा लागत होता.  प्रवाशांना होणारा मनस्ताप थांबवावा म्हणून कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे, सदस्य संदीप ढवळे, श्रीराम बॉईजचे अध्यक्ष शिवाजी सोनवणे, अ‍ॅड. प्रशांत साठे, बबन ठोकळ आदींनी महामार्गाचे देखभाल करणारे चेतक इंटरप्रायजेस व सार्वजनीक बांधकाम विभागाला निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला होता. बांधकाम विभागने याची दखल घेत कचरा टाकणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असून, तसा फलकही या ठिकाणी लावल्याने कचरा टाकण्याचे बंद झाल्याने प्रवाशांना मोकळा श्वास घेता येत आहेत.

महामार्गावरील कामरगाव हद्दीत अज्ञात व्यक्ती सडका भाजीपाला, प्लॅस्टीकचे कागद, मासाचे तुकडे, मृत मासे खोक्यात भरून रस्त्याच्या दुतर्फा टाकत होते. त्यावर मोकाट कुत्रे ताव मारून प्रवाशांचा चावा घेत होते. बबन विठ्ठल ठोकळ यांच्या गायींनी प्लॅस्टीक कागद खाल्याने त्यांचा मृत झाला होता. त्यांची साधारण एक लाख रुपये किंमत होती. या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. सार्वजनीक आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने तत्काळ दखल घेवून सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात साचललेले कचर्‍याचे ढीग जेसीबीने हटविले आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागाने नोटीस बोर्ड लावला असून, यापुढे कोणी कचरा टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कचरा टाकण्याचे प्रमाण थांबले असून, प्रवाशांना मोकळा श्वास मिळत आहे. चेतक कंपनी व सार्वजनीक बांधकाम विभागाने जलद गतीने केलेल्या कार्यवाही बद्दल ग्रामस्थांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

ग्रामस्थांकडून ‘पुढारी’चे आभार
रस्त्याच्या कडेला सडलेला, कुजलेला, ओला कचरा नागरिक टाकत असल्याने परिसरातील नागरिकांना, रस्त्यावरून प्रवास करणार्‍यांना सुटलेल्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत कचर्‍याबाबत उपाययोजना राबविण्यात आल्याने ग्रामस्थांनी ‘पुढारी’चे आभार मानले.

महामार्गानजीक दुर्गंधी सदृष्य कचरा टाकून सार्वजनीक आरोग्य धोक्यात आणू नये. त्यासाठी महामार्गावर गस्त घालणार्‍या पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी व्यक्ती सापडल्यास गुन्हा दाखल करावा.
                                                      -तुकाराम कातोरे,  सरपंच, कामरगाव

Back to top button