नाशिक पदवीधर निवडणूक : अधिकारी-कर्मचारी आज मतदान केंद्राकडे रवाना | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक : अधिकारी-कर्मचारी आज मतदान केंद्राकडे रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीचा जाहीर प्रचार संपुष्टात आला असून, सोमवारी (दि. 30) मतदान होणार आहे. अखेरच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला. दरम्यान, विभागातील पाचही जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचारी रविवारी (दि. 29) मतपेट्या आणि साहित्यासह केंद्राकडे रवाना होत आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 16 उमेदवार नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्षाचा एकही उमेदवार नसल्याने अवघ्या राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे. निवडणुकीत शनिवारी (दि. 28) सायंकाळी 5 नंतर जाहीर प्रचार संपुष्टात आला. तत्पूर्वी सर्व उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी अखेरच्या दिवशी प्रचारासाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसल्या. सायंकाळनंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आता मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. निवडणुकीत जाहीर प्रचार संपुष्टात आला असतानाच प्रशासकीय स्तरावर सोमवारी (दि. 30) होणार्‍या मतदानासाठीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विभागात पाचही जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदान अधिकारी व कर्मचारी हे रविवारी (दि. 29) दुपारी 12 पर्यंत मतदान केंद्राकडे रवाना होतील. नाशिक जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी हे सय्यद पिंप्री येथील निवडणूक शाखेच्या गोदामातून मतपेट्या व साहित्यासह केंद्राकडे रवाना होत आहेत. प्रत्येक केंद्रात एक केंद्र अध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई तसेच एक पोलिस कर्मचारी तैनात केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

* विभागात 2 लाख 62 हजार 731 मतदार
* प्रत्येक केंद्रात 1 सूक्ष्म निरीक्षक तैनात
* मतदान केंद्राचे वेबकास्टिंग, व्हिडिओ शूटिंग
* केंद्रात मतदारांसाठी हेल्पडेस्कची सुविधा
* मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

नाव शोधणे सोपे…
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch ही लिंक दिली आहे. या लिंकद्वारे मतदारांना आपले नाव शोधणे सुलभ होणार आहे.

मतदान केंद्र याप्रमाणे….
जिल्हा                  संख्या
नगर                      147
नाशिक                  99
जळगाव                 40
धुळे                       29
नंदुरबार                 23
एकूण                   338

हेही वाचा:

Back to top button