Nashik : मनपा पंचवटी विभागीय कार्यालयात लाखोंचा अपहार | पुढारी

Nashik : मनपा पंचवटी विभागीय कार्यालयात लाखोंचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयापाठोपाठ पंचवटी विभागीय कार्यालयात सुमारे ५० लाखांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विविध कामांसाठी परवानगी तसेच शुल्क वसूल करताना त्याचा भरणाच महापालिकेच्या तिजोरीत करण्यात आला नाही, तर दुसरीकडे संबंधितांना मनपाच्या दप्तरात नोंद करताना बनावट पावत्या जोडण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. लेखा परीक्षण विभागानेही या घटनेला दुजोरा दिला आहे.

महापालिकेच्या सहा विभागांपैकी आधी नाशिकरोड विभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून मालमत्ता कर वसूल करताना सुमारे २० लाख रुपयांचा भरणा मनपाच्या तिजोरीत केला नसल्याची बाब समोर आली होती. त्यावर मनपाने संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आता पंचवटी विभागीय कार्यालयातीलही अपहाराचा प्रकार समोर आला आहे. विभागीय कार्यालयांकडून विविध प्रकारचे कर, शुल्क, परवाने फी तसेच जन्म मृत्यू नोंद, विवाह या प्रकारच्या सेवांवरही नाममात्र शुल्क आकारले जाते. घरपट्टी, पाणीपट्टी स्वतंत्रपणे वसूल केली जाते. विभागीय कार्यालयात जमा होणाऱ्या करांच्या पावत्या संबंधित नागरिकांना दिल्या जातात. त्याची नोंद नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून केली जाते. त्या संदर्भातील संगणकीय पासवर्ड फक्त विभागीय अधिकाऱ्यांकडेच आहे. कर, शुल्क भरणाऱ्या नागरिकास पावती देऊन त्याची नोंद संगणकात केली जाते. पंचवटी विभागात रस्ता तोडफोड शुल्कासह नळकनेक्शन देण्यासंदर्भात जमा झालेल्या रकमेच्या बनावट पावत्या दिसत असल्या तरी रक्कम मात्र जमा झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. विभागीय कार्यालयात लेखा परीक्षण सुरू असताना ही बाब समोर आली असून, या प्रकरणास लेखा परीक्षण विभागातील सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.

मनपाच्या भूमिकेविषयी शंका

यासंदर्भातील पूर्ण लेखा परीक्षण झाल्यानंतर अपहाराची व्याप्ती समोर येणार आहे. तसेच मनपातील एका महिला कर्मचाऱ्याकडून एका व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अपहार झालेला आहे. परंतु, त्या महिला कर्मचाऱ्याकडून वसुली केली जात नसल्याने मनपा प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button