...होय, तिचा आक्रोश आता शमतोय! उजनी धरणातील प्रदूषणात घट | पुढारी

...होय, तिचा आक्रोश आता शमतोय! उजनी धरणातील प्रदूषणात घट

भरत मल्लाव

भिगवण : उजनी म्हणजे प्रदूषणाचे भांडार, उजनी म्हणजे रक्तरंजित वाळूचे कोठार आणि उजनी म्हणजे गुन्हेगारीचा केंद्रबिंदू. पण गेल्या पाच वर्षांपासून वाळू उपसा बंद झाला आणि उजनीतील गुन्हेगारी व गँगवॉर नियंत्रणात येऊ पाहत आहे. पिस्तूल, तलवार, चाकू कोयत्याची भाषा बोथट झाली आहे. दुसर्‍या बाजूने प्रदूषणात अंशतः घट होऊ लागली आहे. निखळलेल्या जैविक साखळीत सुधारणा होऊ लागली आहे. पक्षी भयमुक्त झाले आहेत आणि म्हणूनच गुन्हेगारीमुळे कोंढलेला उजनीचा श्वास आता कुठेतरी मोकळा होतोय…होय, तिचा आक्रोश आता शमतोय.

पुण्याचे सांडपाणी, पिंपरी-चिंचवड, कुरकुंभचे रासायनिक पाणी थेट उजनीत मिसळत असल्याने आधीच उजनीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झालेले. त्यात बेकायदेशीर वाळू उपशाने तर आणखीच भर पडून उजनी अक्षरशः काळवंडली होती. त्यामुळे उजनीचे पाणी प्रचंड प्रमाणात दूषित झाल्याने ते वापरण्यास अयोग्य झाले होते. जैविक साखळी तर निखळून पडली आणि शंक, शिंपले, मासे मृत झाले व अपरिमित नैसर्गिक हानी उजनीची झाली. माणसे, जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाले, अनेक रोगांनी हातपाय पसरले आहेत, शेती नापीक झाली आहे. आता पूर्ण नसली तरी उजनी आता काही प्रमाणात का होईना पूर्वपदाकडे वाटचाल करू लागली आहे.

कारण उजनीतील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात रोखला गेला आहे. भिगवण, कुंभारगाव, तक्रारवाडी, डाळज, पळसदेव, शहा, कालठण, डिकसळ, कोंढार चिंचोली, राजेगाव, टाकळी आदी भाग हा वाळू उपशाची महत्त्वाची ठिकाणे आहेत. गेल्या दहा- पंधरा वर्षात येथे कोट्यवधी रुपयांचा बेकायदा वाळू उपसा करण्यात आला. यातून कित्येकदा गँगवॉर भडकले व यातून वाळू रक्ताळली, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडले, गुन्हेगारी वाढली, विशेषतः युवावर्ग यामध्ये गुरफटत गेला होता.

हा वर्ग पिस्तूल, तलवार, चाकू व कोयत्याची भाषा बोलत असल्याने उजनी दहशतीचे केंद्र बनले होते. तर दुसर्‍या बाजूने प्रदूषणात भर पडली. बोटींच्या दिवस- रात्र आवाजाने उजनीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या विविध जातींच्या पक्ष्यांना हा भाग असुरक्षित वाटू लागला होता. त्यामुळे हे पक्षी भयभीत होऊन त्यांच्या स्थलांतरावर गंभीर परिणाम जाणवू लागला होता. साहजिकच देश- विदेशातून येणार्‍या पक्ष्यांची संख्या घटू लागली होती.

Back to top button