कोल्हापूर : जिल्हा ग्रंथोत्सवास आजपासून प्रारंभ | पुढारी

कोल्हापूर : जिल्हा ग्रंथोत्सवास आजपासून प्रारंभ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि.9 व 10 रोजी जिल्हा ग्रंथोत्सव- 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ग्रंथदिंडी, कवी संमेलन, काव्य नाट्यानुभव, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवन येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत.

राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आ. प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती असेल. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कादंबरीकार दि. बा. पाटील उपस्थित राहणार आहेत.

सकाळी साडेआठ वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीचा प्रारंभ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक किरण गुरव यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने होईल. दुपारी तीन वाजता कविवर्य पाटलोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. शनिवारी (दि.10) सकाळी 11 वाजता ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा विसुभाऊ बापट यांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी तीन वाजता शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऐकाल तर वाचाल’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रमुख वक्ते थिंक बँक लाईव्हचे संपादक विनायक पाचलग असणार आहेत.

दुपारी चार वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप सभारंभ ज्येष्ठ लेखिका सुमित्रा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. पांडुरंग सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले.

Back to top button